परळीच्या मोंढ्यात बेशिस्तीमुळे व्यापारी त्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:23+5:302021-03-06T04:31:23+5:30
परळी : येथील मोंढा मार्केट भागात शिस्तीचा अभाव असून, फळ, भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने गर्दी होत आहे. ...

परळीच्या मोंढ्यात बेशिस्तीमुळे व्यापारी त्रासले
परळी : येथील मोंढा मार्केट भागात शिस्तीचा अभाव असून, फळ, भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने गर्दी होत आहे. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शहरातील नागरिक व मोंढ्यातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. पर्यायी व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास आठ मार्चपासून व्यापार बंदचा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे. याप्रश्नी शुक्रवारी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद, परळी शहर ठाण्यात निवेदन दिले आहे.
शहरातील मोंढ्यातील हनुमान मंदिराच्या समोर व पूर्व बाजूस अनधिकृतपणे फळविक्रेते सार्वजनिक रस्त्यावर गाडे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. परळी शहर पोलिसांतर्फे अनेक वेळा रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या फळ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली; परंतु रस्त्यावर गाडे लावून भाजी, फळे व अन्य वस्तूंची विक्री करीत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गर्दी होत आहे. या गर्दीतून इतर वाहनेही चालवणे अशक्य झाले आहे. याप्रश्नी आठ मार्च रोजी व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून निषेध करणार आहेत. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर सिद्धार्थ जैन, आशिष भंडारी यांच्यासह इतर व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
050321\img-20210305-wa0488_14.jpg