आजपासून पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनाही कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:38+5:302021-02-05T08:26:38+5:30
बीड : सुरुवातीला आरोग्यकर्मींना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. आता गुरुवारपासून पोलीस व पालिका, नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांनाही लस ...

आजपासून पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनाही कोरोना लस
बीड : सुरुवातीला आरोग्यकर्मींना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. आता गुरुवारपासून पोलीस व पालिका, नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे. यासाठी बीड व अंबाजोगाईत लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. जिल्ह्यात असे फ्रंटलाइन वर्कर ५ हजार ३०० असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. त्यासाठी बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज आणि धारूर येथे लसीकरण केंद्र तयार केले. सुरुवातीला आरोग्यकर्मींना प्राधान्य देऊन कोरोना लस टोचण्यात आली. आतापर्यंत जवळपास ७ हजारांपेक्षा जास्त लाभार्थींना लस देण्यात आली आहे. आता आरोग्यकर्मींपाठोपाठ गुरुवारपासून फ्रंटलाइन वर्कर असलेले पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी बीड व अंबाजोगाईत लसीकरण केंद्रे तयार केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बुधवारी केवळ ३० टक्के लसीकरण
बीड जिल्हा हा कोरोना लसीकरणात मागील तीन चार दिवस राज्यात अव्वल होता; परंतु पल्स पोलिओ मोहीम पार पडल्यानंतर आता घरोघरी जाऊन कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांचे लसीकडे दुर्लक्ष हाेत आहे. बुधवारी चार केंद्रांवर केवळ ३० टक्केच लसीकरण पार पडले.
महसूलमधील माहिती अपडेट नाही
महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लस दिली जात आहे. आतापर्यंत केवळ ६ लोकांचा डाटा अपलोड झाला होता. त्यामुळे त्यांना लस टोचण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांना डाटा अपलोड होताच लस दिली जाणार आहे. याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.
कोट
आरोग्यकर्मींपाठोपाठ आता महसूल, पोलीस आणि नगरपालिका, नगरपंचायतमधील फ्रंटलाइन वर्कर कर्मचाऱ्यांना आजपासून लस दिली जाणार आहे. बीड व अंबाजोगाई येथे त्यांच्यासाठी लसीकरण केंद्रे असतील. पोलिओचे सर्वेक्षण संपल्यानंतर लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा विचार आहे.
-डॉ. संजय कदम,
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण बीड