माहिती कार्यालयाकडून मिळेना वेळेवर माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:55+5:302021-02-05T08:26:55+5:30
बीड : येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून माध्यमांना वेळेवर माहिती देण्यास दिरंगाई होत आहे. असे प्रकार वारंवार निदर्शनास आणून ...

माहिती कार्यालयाकडून मिळेना वेळेवर माहिती
बीड : येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून माध्यमांना वेळेवर माहिती देण्यास दिरंगाई होत आहे. असे प्रकार वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही यावर काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. हे कार्यालय केवळ मंत्र्यांची दौरे, भाषणांचे वार्तांकन करण्यावर भर देत आहे. तसेच मुंबईच्या बातम्या पुढे ढकलण्यात अग्रेसर असल्याचे दिसते.
शासन आणि प्रशासनाची सर्व माहिती मुद्रित आणि अमुद्रित माध्यमांना देण्याची जबाबदारी ही जिल्हा माहिती कार्यालयाची असते. येथे अधिकारी, कर्मचारी, छायाचित्रकार अशी पदे आहेत. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी माध्यमांना कोणतीच माहिती वेळेवर देत नसल्याचे समोर येत आहे. रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होती. याचा मुख्य कार्यक्रम कोठे झाला, जिल्ह्यात किती लसीकरण झाले, याची माहिती सायंकाळी ६ वाजेपर्यंत माध्यमांना मिळालेली नव्हती. यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती देण्यात आली नव्हती. राज्यात इतर जिल्हे सर्व माहिती देत असताना बीड कार्यालय मात्र झोपेतच होते.
दरम्यान, एखादा मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यक्रमाची बातमी देण्यात हे कार्यालय धन्यता मानत आहे. तसेच मुंबईच्या बातम्या पुढे ढकलण्यातही हे कार्यालय पुढे असते. बीडच्या माध्यमांना मात्र, त्यांच्याकडून कधीच वेळेवर माहिती दिली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या कार्यालयाच्या कामकाजावर पत्रकारही आक्रमक झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना संपर्क केला, परंतु त्यांनी मोबोइल घेतला नाही.
कोट
पल्स पोलिओची माहिती आरोग्य विभागाने दिली तर बातमी पाठवू. कार्यक्रमाची बातमी आम्ही नाही केली. सध्या बातमी पाठविणार नाही.
किरण वाघ
माहिती अधिकारी, बीड