महसूल पथकाच्या धाडीत वाळू माफियांचे तीन टॅक्टर व एक जेसीबी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:08 IST2020-12-12T13:08:15+5:302020-12-12T13:08:57+5:30
sand mafia, Beed News : आष्टी तालुक्यातील देविनिमगांव शिवारातील कारवाई

महसूल पथकाच्या धाडीत वाळू माफियांचे तीन टॅक्टर व एक जेसीबी ताब्यात
कडा (बीड ) : देवि निमगांव परिसरातील गाळपेरा जमिनीतून अवैध वाळू उपस्यावर महसूल पथकाने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कारवाई केली. यावेळी महसूल पथकाने तीन टॅक्टर व एक जेसीबी मशिन ताब्यात घेतली आहे.
आष्टी तालुक्यातील देविनिमगांव शिवारातील रियाज शेख यांच्या गाळपेरा जमिनीतून शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास तीन टॅक्टर व एक जेसीबी मशीन अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी गेले असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी मिळाली. यावरून त्यांनी रात्री १ वाजेच्या सुमारास महसूल पथक आणि कडा चौकीचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने देविनिमागाव शिवारात धाड टाकली.
यावेळी तीन टॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करताना काही जण आढळून आले. यानंतर महसूल पथकाने चारही वाहने ताब्यात घेऊन कडा पोलिस चौकिच्या आवारात लावली आहेत. याप्रकरणी वाहन मालकांवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली. या कारवाईत नायब तहसिलदार प्रदिप पांडुळे, मंडळ अधिकारी इंद्रकांत शेंदुरकर, तलाठी प्रविण बोरूडे व अरूण जवंजाळ यांचा सहभाग होता.