अंबेजोगाईत एका रात्रीत तीन चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:23+5:302021-03-23T04:36:23+5:30
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी बिनधास्तपणे अक्षरशः धुमाकूळ घातला. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह मोंढ्यातील दुकाने आणि स्वाराती रुग्णालय ...

अंबेजोगाईत एका रात्रीत तीन चोऱ्या
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी बिनधास्तपणे अक्षरशः धुमाकूळ घातला. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह मोंढ्यातील दुकाने आणि स्वाराती रुग्णालय परिसरातील एक घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लुटून नेला. शहरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच, घरफोड्याही वाढल्याने नागरिकात दहशत पसरली आहे. एकाच रात्रीतून तीन गजबजलेल्या ठिकाणी चोऱ्या करून चोरटे उघड आव्हान देत असताना, पोलीस अधिकारी मात्र ठाण्यात कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांवर रुबाब झाडण्यात धन्यता मानत आहेत.
दुसऱ्या घटनेत स्वाराती रुग्णालय परिसरात नर्सेस क्वार्टरमध्ये राहणारे युवराज रामराव राख हे रविवारी सुट्टीनिमित्त कुटुंबीयांसह मूळ गावी होळ (ता. केज) येथे गेले होते. रात्री १०च्या नंतर कधीतरी चोरट्यांनी कोयंडा आणि कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील समान अस्ताव्यस्त करत, त्यांनी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी सकाळी ८ वाजता युवराज राख हे गावाहून घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तिसरी चोरी मोंढ्यात झाली. येथील हार्डवेअरचे व्यापारी अनिल मुंदडा यांचे दुकान फोडून चोरट्यांनी हजारोंचा मुद्देमाल चोरून नेला. दुकानमालक आजारी असल्याने निश्चित किती ऐवज चोरीला गेला आहे, हे अद्याप समजू शकले नाही. सायंकाळपर्यंत या चोरीची पोलिसात नोंद झाली नव्हती.
कायदा-सुव्यवस्था ढासळली; गुंडगिरी, चोऱ्या वाढल्या
अवैध धंद्याचे सोडा, किमान पोलिसांनी गुंड, चोरांपासून आम्हाला संरक्षण द्यावे, एवढ्या माफक अपेक्षेवर आता नागरिक आले आहेत, परंतु शहरातील वाढत्या गुंडगिरीसोबतच चोऱ्याही वाढल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. पोलीस मात्र ठाण्यात राबता असलेल्या गुंड, अवैध धंदेवाल्यांना सन्मानाची वागणूक देऊन कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिकांवर रुबाब झाडत आहेत. यामुळे संभ्रमात असलेले नागरिकांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालून शहराला शिस्त लावावी आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था सावरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.