परळीतील तीन मुले अकोल्यात सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 02:11 IST2017-03-11T02:11:18+5:302017-03-11T02:11:18+5:30
बीड जिल्ह्यातील परळी येथील बेपत्ता झालेली तीन शाळकरी मुले अकोला येथे सापडली.

परळीतील तीन मुले अकोल्यात सापडली
अकोला, दि. १0- बीड जिल्ह्यातील परळी येथील तीन शाळकरी मुले गुरुवारी बेपत्ता झाली होती. ही मुले अकोला येथे सापडली. ते स्वत:हून पळाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
वरद कौलवार (१२), गजानन आरसुले (१२) व सर्मथ भोसले (१३) अशी त्यांची नावे आहेत. ते आठवीत शिकतात. गुरुवारी शाळेतून न परतल्याने नातेवाईकांनी परळी ठाण्यात तक्रार दिली होती. तिघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, या तिघांनी पंढरपूर - अकोला बसमधून अकोला गाठले. यापैकी कौलवार याच्याकडे एक हजार रुपये तर आरसुलेकडे पाचशे रुपये होते. तेथे ते रात्री ९ वाजता पोहोचले. बसस्थाकावरुन ते भाड्याने रिक्षा करुन रेल्वेस्थानकावर पोहोचले. एका पोलीस कर्मचार्याला त्यांनी आम्ही परळीहून आलो आहोत, आम्हाला परत जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर पोलिसाने त्यांना अकोला ठाण्यात नेले. त्यांच्याकडून पालकांचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क केला. शिवाय पोलिसांनाही याची माहिती दिली. शुक्रवारी त्यांना परळीला पाठविले.