तिघांचा मृत्यू, ७११ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST2021-04-09T04:35:31+5:302021-04-09T04:35:31+5:30
बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, केज, माजलगाव आणि परळी या ७ तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने उपचारासाठी रुग्णांना खाटा मिळणे ...

तिघांचा मृत्यू, ७११ नवे रूग्ण
बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, केज, माजलगाव आणि परळी या ७ तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने उपचारासाठी रुग्णांना खाटा मिळणे कठीण होऊ लागले आहे, शिवाय मृत्यूसंख्याही वेगाने वाढल्याने जिल्हाभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, गुरुवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ५ हजार ८९९ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात ५ हजार १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ७११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १५८, आष्टी १०३, बीड १८९, धारुर ११, गेवराई ५६, केज ४५, माजलगाव ५६, परळी ४४, पाटोदा २२, शिरुर १६ आणि वडवणी तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात ३०६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांमध्ये गेवराई तालुक्यातील गढी येथील ६५ वर्षीय महिला, माजलगाव येथील ९५ वर्षीय पुरुष आणि पाटोदा येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २९ हजार ७८२ इतका झाला असून यापैकी २६ हजार १८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण मृत्यूची संख्या ६८५ झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.