ठाण्यातून पळालेला अत्याचारातील आरोपी तीन दिवसानंतरही फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:07 IST2019-06-06T20:05:24+5:302019-06-06T20:07:08+5:30
आष्टी पोलिसांना तब्बल तीन दिवस उलटूनही अद्याप सुनिलला अटक करण्यात यश आलेले नाही.

ठाण्यातून पळालेला अत्याचारातील आरोपी तीन दिवसानंतरही फरारच
बीड : अत्याचारासारखा गुन्हा केल्यानंतर चौकशीसाठी ठाण्यात बसविलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. या घटनेला तीन दिवस उलटूनही आष्टी पोलिसांना अद्यापही तो सापडलेला नाही. आष्टी पोलिसांकडून तपास सुरू आहे, असे कारण सांगून हात झटकत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील सुनिल डुकरे याने एका मुलीला चाकुचा धाक दाखवित अत्याचार केला होता. त्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले होते. येथे पोलिसांची नजर चुकवून त्याने पलायन केले होते. विशेष म्हणजे आष्टी पोलिसांनी ठाण्यात नोंद नाही, असे कारण सांगत वरिष्ठांपासून ही माहिती दडविली होती. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असल्याने आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांना समजल्याने त्यांनी उपअधीक्षक विजय लगारे आणि आष्टीचे पोलीस निरीक्षक एम.बी.सुर्यवंशी यांची चांगलीच कानवउघडणी केली होती. आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, आष्टी पोलिसांना तब्बल तीन दिवस उलटूनही अद्याप सुनिलला अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आष्टी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
चार पथके करतात काय?
पोलीस निरीक्षक एम.बी.सुर्यवंशी म्हणाले, तपासासाठी चार पथके नियूक्त केलेले आहेत. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप कसलीच माहिती त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हे पथके करतात काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत आरोपीने पलायन केले, त्यांचा अहवाल अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी मागितला होता. या अहवालाबाबत पोनि सुर्यवंशी यांना विचारणा केली असता, त्यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगत कानावर हात ठेवले. अहवाल पाठविला की नाही? यावर बोलण्यास त्यांनी टाळल्याने कामचुकारांना त्यांचे अभय असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेच्या नातेवाईकांमधून आष्टी पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.