दिंद्रुडमध्ये एका रात्रीत तीन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:26+5:302021-09-04T04:40:26+5:30
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालीत तीन ठिकाणी दोन ठिकाणी चोरी केली, तर एका ...

दिंद्रुडमध्ये एका रात्रीत तीन घरफोड्या
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालीत तीन ठिकाणी दोन ठिकाणी चोरी केली, तर एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. दोन ठिकाणी चोरट्यांनी जवळपास आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अहिल्यानगर येथील रहिवासी रवि सोन्नवर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील व्यक्ती ज्या खाेलीत झोपले होते, त्या खोल्यांच्या बाहेरून कड्या लावत चोरट्यांनी स्वयंपाक घरात प्रवेश केला. तेथील पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख पंधरा हजार रुपये पेटीसह चोरून नेले. दिंद्रुड येथीलच अनिस असेफ शेख यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करीत, कपाट फोडून दीड तोळा सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. दोन ठिकाणी डाव साधल्यानंतर, चोरट्यांनी बालू काचगुंडे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, काचगुंडे यांना जाग आल्याने चोरांनी तेथून धूम ठोकली. यावेळी या चोरट्यांनी तोडलेली सर्व कुलूप सोबत नेली. चोरीदरम्यान चोरट्यांनी शेजारच्या घरांच्या कड्या बाहेरून लावल्या. चोरीची माहिती मिळाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दिंद्रुड पोलीस हद्दीत गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून, दिंद्रुड पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान आहे. दिंद्रुड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.