माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:51 IST2020-10-31T18:49:57+5:302020-10-31T18:51:30+5:30
पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९ नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी तीन अर्ज आले आहेत.

माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल
माजलगाव : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३ अर्ज आले असून यातील दोन अर्ज हे एकाच उमेदवाराने तर तिसरा अर्ज एका उमेदवाराने भरला. राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत १५ नगरसेवक असल्याचेे साांगितले जात आहे. त्यांना सहलीवर नेल्याचे सांगण्यात येत आहे.
पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९ नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी तीन अर्ज आले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून रेशमा दिपक मेंडके यांचा एक अर्ज तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शेख मंजुर शेख चांद यांचे दोन अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीदेखील करण्यात आली असुन आक्षेपासाठी ५ नोव्हेंबर ही तारीख आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आल्याची माहिती पिठासीन अधिकारी श्रीकांत गायकवाड व स.पिठासीन अधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे ७ नगरसेवक असून दोन शिवसेनेचे तर ६ नगरसेवक भाजप व आघाडीचे गळाला लागले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाईल असे बोलले जात आहे. माजलगाव नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले असून, नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष कोण होईल? याबाबत उत्सुकता आहे.