केजच्या सराफा व्यापा-याला लुटण्यासाठी चोरांची होती महिनाभरापासून ‘फिल्डिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:35 IST2018-02-14T23:34:54+5:302018-02-14T23:35:08+5:30
महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मद्यप्राशन केले. सायंकाळी नॉनव्हेजवर ताव मारला आणि रात्रीच्यावेळी सराफा व्यापा-याला कारखाली चिरडून त्याच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटले. हे कोणत्याही चित्रपटातील कथानक नसून केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांची हत्या करून लुटल्याचा सत्य प्रकार आहे. थोरात यांच्यावर मागील महिनाभरापासून ही कोल्हापूरची ‘आर्या गँग’ पाळत ठेवून असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

केजच्या सराफा व्यापा-याला लुटण्यासाठी चोरांची होती महिनाभरापासून ‘फिल्डिंग’
बीड : महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर मद्यप्राशन केले. सायंकाळी नॉनव्हेजवर ताव मारला आणि रात्रीच्यावेळी सराफा व्यापा-याला कारखाली चिरडून त्याच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटले. हे कोणत्याही चित्रपटातील कथानक नसून केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांची हत्या करून लुटल्याचा सत्य प्रकार आहे. थोरात यांच्यावर मागील महिनाभरापासून ही कोल्हापूरची ‘आर्या गँग’ पाळत ठेवून असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मंगळवारी रात्री विकास थोरात यांचे केजमध्ये सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून कुंबेफळ या आपल्या गावी दुचाकीवरून (एमएच २३ एम ९९१९) निघाले होते. याचवेळी पाळत ठेवून असलेल्या आर्या गँगचा म्होरक्या अमोल मोहिते व इतर तिघांनी त्यांचा पाठलाग केला.
शहरापासून काही अंतरावर येताच चोरट्यांनी आपल्या कारची (एमएच ०९ एबी ६८४७) थोरात यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये विकास थोरात खाली पडले आणि डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले.
त्यांच्याजवळील पाच लाख रूपये किंमतीच्या दागिन्यांची बॅग घेऊन त्यांनी पळ काढला. केज पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वायरलेसवरून परिसरातील ठाणे प्रभारींना संदेश देत नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी धनेगावच्या दिशेन पळाले. या आरोपींची कार खराब झाल्याने नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला होता. यातील अमोल हा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. तर इतर तिघे पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला बेड्या ठोकल्या.
पहाटेच्या सुमारास इतर तिनही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. या आरोपिंकडून लुटलेला मुद्देमाल परत केला आहे. केज पोलीस ठाण्यात प्रकाश थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यांना ठोकल्या बेड्या
अमोल उर्र्फ आर्याभाई संभाजी मोहिते (३५ रा.कापशी ता.कागल, जि.कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (३९ रा.महादेव गल्ली रा.निपाणी जि.बेळगाव), महादेव रमेश डोंगरे, (२१), अतुल रमेश जोगदंड (२० रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड) यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
विहिरीतून गोळ्या घालण्याची धमकी
गँगचा म्होरक्या अमोला हा विहिरीत पडला होता. काही नागरिकांनी संतापाच्या भरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. याचवेळी विहिरीत पडल्यानंतरही अमोल मात्र हातात बंदूक घेऊन नागरिकांना गोळ्या घालण्याची धमकी देत होता.
महादेव, अतुलला होती माहिती
अमोल आणि अमर हे दोघेही इतर ठिकाणच होते. त्यामुळे लुटण्याची सर्व माहिती स्थानिकचे महादेव आणि अतूल यांनी दिली. महिन्यापासून आखलेला हा प्लॅन महाशिवरात्रीच्या दिवशी ‘सक्सेस’ झाला. यामध्ये मात्र नाहक विकास थोरातचा बळी गेला.
नाकाबंदी केल्याने पळण्यास अडचण
घटनेची माहिती मिळताच सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मुख्य रस्त्यांवरून बाहेर जाता आले नाही. पोलिसांनी अंतर्गत रस्ते आणि परिसर पिंजून काढला आणि सदरील तिघेही जाळ्यात अडकले.
बंदुकीसह धारदार शस्त्रे जप्त
लुटमार करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदुकीसह कत्ती, लाकडी दांडे, एटीएम कार्ड, पासबुक, मिरची पूड इ. साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
महादेव, अतुल होते पाठलागावर
मंगळवारी सायंकाळपासूनच महादेव व अतुल विकास थोरात यांच्यावर पाळत ठेवून होते. ते दुकान बंद करून निघताच या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. अमोल व अमर हे कारमध्ये होते.
सावधान राहण्याची गरज
रात्रीच्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल सोबत घेऊन एकट्याने दुचाकीवरून जाणे थोरात यांना जिवावर बेतले. आजही अनेकजण असे कृत्य करतात. अशा घटनांना नियंत्रण बसविण्यासाठी नागरिकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. मुद्देमालापेक्षा आपला जीव कधीही महत्त्वाचा, हेच लक्षात ठेवावे.
‘एसपी ते कॉन्स्टेबल’ कारवाईत सहभागी
ही कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यापासून ते युसूफ वडगावच्या पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वच सहभागी झाले होते.
अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, धारूरचे पोलीस निरीक्षक जे.एल.तेली, केजचे पोलीस निरीक्षक एस.जे.माने, अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम, युसूफवडगावचे सपोनि राहुल देशपांडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी रात्र जागून काढली.