बीड जिल्ह्यात बसस्थानकांमध्ये चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:30 IST2017-12-31T23:30:08+5:302017-12-31T23:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत ...

बीड जिल्ह्यात बसस्थानकांमध्ये चोरांचा सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांची बॅग, खिसे कापून ऐवज लंपास करू लागले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. केजच्या घटनेनंतर अंबाजोगाई बसस्थानकात रविवारी व्यापा-याची बॅग लंपास केली. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
बाळासाहेब बाबुराव काळे (रा.पट्टीवडगाव) हे अंबाजोगाईहून लातूरला जात होते. या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. बसमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत काळे यांच्या हातातील बॅग लंपास केली. यामध्ये ७० हजार रूपयांची रोख रक्कम होती. काळे यांनी आरडाओरडा केला. तसेच इतरत्र सर्वत्र शोध घेतला परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
दरम्यान, शनिवारीच केज बसस्थानकात एका प्रवाशाची ८५ हजार रूपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बसस्थानकातील वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानकात सीसीटीव्ही बसविण्याबरोबरच पोलिसांनी गस्त घालून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांनीही आपले सामान, रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.