थर्मलच्या राखेमुळे आरोग्य बिघडले, पिकांचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:55+5:302021-02-05T08:23:55+5:30
परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक ...

थर्मलच्या राखेमुळे आरोग्य बिघडले, पिकांचेही नुकसान
परळी : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात निर्मिती होणाऱ्या विजेचे फायदे असले तरी या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावरील दुष्परिणामानंतर थर्मलची राख शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. नवीन थर्मलमधून बाहेर पडत असलेल्या करड्या व काळसर राखेमुळे आमचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हरिष नागरगोजेसह इतर शेतकऱ्यांनी दिला आहे.
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांना विविध आजार जडले आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच आता पिकांवर संकट आले आहे. वीज निर्मितीनंतरची राख ज्या ठिकाणी खाली करण्यात येते तेथून दिवसभर अक्षरशः धुराचे लोट निघत आहेत. या राखेमुळे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. आमच्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा या भागातील शेतकऱ्यांसह औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर राखेमुळे करपलेली पिके आणून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.