वयाची शंभरी पार केलेले जिल्ह्यात जवळपास ४८४ मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:42+5:302021-02-05T08:27:42+5:30
बीड : फार कमी लोकांच्या नशिबी दीर्घायुष्य येते. सकस आणि समतोल आहार, निर्व्यसन, अंगमेहनत हे त्यांच्या निरोगी तब्येतीचे रहस्य. ...

वयाची शंभरी पार केलेले जिल्ह्यात जवळपास ४८४ मतदार
बीड : फार कमी लोकांच्या नशिबी दीर्घायुष्य येते. सकस आणि समतोल आहार, निर्व्यसन, अंगमेहनत हे त्यांच्या निरोगी तब्येतीचे रहस्य. वयाची शंभरी गाठूनही प्रकृती उत्तम असलेले जवळपास ४८४ मतदार बीड जिल्ह्यात आढळले.
नुकत्याच बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. यापैकी १८ ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. १११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले, तेव्हा शंभरी गाठलेल्या अनेक मतदारांनी कुणाचीही मदत न घेता मतदान केले होते. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम होती. दृष्टी चांगली होती. समतोल आहार वेळेवर घेणे, निर्व्यसन आणि अंगमेहनत हे उत्तम प्रकृतीचे रहस्य असल्याचे अनेकांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेतला तर बीड जिल्ह्यात बीड लोकसभा मतदारसंघात १६,२१,१०२ मतदार होते. यापैकी ८,६१,६९६ पुरुष मतदार तर ७,५९,३९९ महिला मतदार होते. यापैकी १३ लाख ५२ हजार ३९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
नव्वदी पार केलेल्या मतदानाची संख्याही खूप मोठी आहे. वयाची शंभरी गाठलेल्या अनेक मतदारांनी आपण आजही न चुकता मतदान करतो. नुकत्याच झालेल्या २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आपण मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा विधानसभासारख्या मोठ्या निवडणुकीसाठी उमेदवार आमच्या बाबतीत फारसे उत्सुक नसतात. परंतु, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदसारख्या निवडणुकीत मात्र आम्हाला खांद्यावर, कडेवर मतदानासाठी नेतात.