मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडें यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचललेल्या पावलांमुळे शेवटी वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. करोडोंची मालमत्ता जप्त झाल्याशिवाय कराड गॅंगचे अन्य गुन्हे उघड होणार नाहीत, असे आ. धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
याप्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी असून त्याचा आणि प्रतीक घुले या दोघांचा जास्त सहभाग आहे. वाल्मीक कराड (आका) आता शरण आले आहेत हे शंभर टक्के १२० ब मध्ये आहेत; पण माझा अंदाज आहे जर त्यांनीही व्हिडीओ कॉल पाहिला असेल तर ते पण ३०२ मध्ये येऊ शकतात, असे धस म्हणाले.
वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक नकोपुणे : वाल्मीक कराड आपणहून पोलिसांना शरण आला आहे. आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र, कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाऊ नये, अशी मागणी मराठा सेवकांनी (अखंड मराठा समाज - जरांगे पाटील) केली आहे.
कराड याने सीआयडी मुख्यालयात येऊन आत्मसमर्पण केल्यावर अखंड मराठा समाज जरांगे पाटील यांचे काही मराठा सेवक सीआयडी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना आत येण्यास मज्जाव केला.
मराठा सेवक अर्चना शहा भिवरे पाटील म्हणाल्या, आम्ही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात मराठा सेवक म्हणून काम करीत आहोत. आज मराठा असलेले संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येचा निषेध म्हणून आम्ही मोर्चे काढत होतो, सभा घेत होतो. त्याला कुठे तरी यश मिळाले आणि कराड हा पोलिसांसमोर शरण आला. कुठल्याही परिस्थितीत वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी.
आ. धस यांनी पुन्हा वाचला बीडचा पाढाऑक्टोबर २०२३ ला पाटोदा तालुक्यात अशीच घटना घडली होती. एका कंपनीच्या बंडगर नावाच्या अधिकाऱ्यांना असेच उचलण्यात आले होते, तेव्हा मी सांगितले होते परळी पॅटर्न पाटोद्यात आणू नका. खालचा अधिकारी उचलायचा आणि खंडणी मागायची, असे प्रकार सुरू होते. असे प्रकार पचल्याने दोन कोटींची खंडणी मागायची यांची हिंमत झाली. पन्नास लाख घेतले. उरलेले दीड कोटी मागायला माणसे पाठविली होती. आकानेच ही माणसे पाठविली होती. याप्रकरणी मोक्का कायदा लावण्याची घोषणा आधीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असेही धस म्हणाले.