बीड : माजी मंत्री तथा आ. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर बँकॉकला जाणारे विमान परत फिरविले. त्यासाठी निगरगठ्ठ झालेली यंत्रणा आणि संपूर्ण सरकार कामाला लागले. परंतु, याच राज्यातील रहिवासी असलेले ८ हजार ५२ लोक जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत बेपत्ता झाले आहेत. त्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. यांचा शोध कोण घेणार? असा सवाल आता सरकारला विचारला जात आहे.
प्रेमप्रकरण, राग, घरगुती भांडण अशा विविध कारणांमुळे लहान मुलांसह वृद्ध घर सोडतात. याची पोलिस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंदही होते. पोलिसांकडून त्यांचे फोटो घेऊन वेबसाईटवर अपलोड केले जातात. परंतु, त्यांचा शोध लागावा, यासाठी फारशी कठोर पावले उचलली जात नाहीत. इकडे नातेवाईक पोटचा गोळा बेपत्ता झाल्याने अन्नपाणी सोडतात. शोध घ्यावा म्हणून पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवतात. परंतु, याचे पोलिस यंत्रणा आणि शासनाला काहीच देणेघेणे नसते. मात्र, एखाद्या मोठ्या नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे. नेत्याचा मुलगा असल्याने मंत्री, आमदारांसह अनेक नेते कामाला लागले. निगरगठ्ठ झालेली पोलिस यंत्रणाही शोधासाठी धावपळ करू लागली. मुलगा सापडल्यानंतर यंत्रणेने मोकळा श्वास घेतला खरा, परंतु राज्यातील आठ हजार लोक मागील सव्वा महिन्यात बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सामान्यांसाठी वेगळा न्याय का?घरातून एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलिस ठाण्यात तासनतास बसवून ठेवले जाते. परंतु, माजी मंत्र्याच्या मुलाचा शोध घेण्यासाठी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर आपले राजकीय वजन वापरून बँकॉकला जाणारे विमान परत पुण्यात बोलावण्यात आले. नेत्यांसाठी एक आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल सरकारला विचारला जात आहे.
यांच्यासाठी यंत्रणा पळणार का?चालू वर्षातील १२ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील १८ वर्षांवरील ७ हजार ४८१ तर अल्पवयीन ५७१ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. आता या लोकांसाठी यंत्रणा पळणार का? असा प्रश्न आहे.
अशी आहे बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी (२०२५) जानेवारी१८ वर्षांवरीलपुरूष - २३८२स्त्री - ३०३१
१८ वर्षांखालीलमुले - ५५मुली - ३९०
फेब्रुवारी१८ वर्षांवरीलपुरूष - ९२०स्त्री - ११४३
१८ वर्षांखालीलमुले - ११मुली - ११५