राष्ट्रीय महामार्गावर थातूर -मातूर काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:09+5:302021-02-05T08:22:09+5:30
धारूर : खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर धारूर - तेलगाव रस्त्यावर घाटालगत पाचशे फूट अंतरावर अरणवाडी साठवण ...

राष्ट्रीय महामार्गावर थातूर -मातूर काम
धारूर
: खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर धारूर - तेलगाव रस्त्यावर घाटालगत पाचशे फूट अंतरावर अरणवाडी साठवण तलावात रस्ता उंचीचे काम सुरू आहे. हे काम पाच महिन्यांपासून सुरु आहे. आधी पक्के मजबूतीकरण न करता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. कमी डांबर टाकून थातूर - मातूर काम करण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशीच उखडत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
खामगाव - पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग धारूर येथील घाटातून जात आहे. येथील घाटालगत अरणवाडी साठवण तलावाचे काम सुरू आहे. हा रस्ता तलावाबाहेरून काढण्यात आला आहे. रस्त्याचा पाचशे फूट अंतराचा भाग हा तलावात येत आहे. तलावाची धार कोंडल्यास या रस्त्यावर भविष्यात पाणी येण्याची शक्यता असल्याने मागील काही महिन्यांपासून रस्त्याची उंची वाढविण्यासाठी काम करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम टाकून उंची वाढविली आहे. उंची वाढवितांना काही भागात अरूंद असा मुरूम टाकण्यात आला आहे. रस्त्यावर मुरुम टाकल्यानंतर मागील पाच महिन्यांपासून काम बंद होते. आता महिनाभरापासून रस्त्याचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अगदी अरूंद असे काम करण्यात आले आहे. मुरूमावर खडी टाकून थातूर -मातूर मजबूतीकरण करण्यात आले आहे. आता गुत्तेदाराकडून डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खडी टाकण्यापूर्वी डांबर वापरण्यात येत नसल्याने दुसऱ्या दिवशीच काम उखडत आहे. कमी डांबर वापरून थातूर -मातूर काम सुरू आहे . याकडे सबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.