सासूच्या दिशेने गोळी झाडणाऱ्या जावयास दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:47+5:302021-01-10T04:25:47+5:30
अंबाजोगाई : पत्नीला नांदवण्यास पाठवत नसल्याच्या कारणावरून सासूच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा जावई तानाजी विठ्ठल ...

सासूच्या दिशेने गोळी झाडणाऱ्या जावयास दहा वर्षांची शिक्षा
अंबाजोगाई : पत्नीला नांदवण्यास पाठवत नसल्याच्या कारणावरून सासूच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा जावई तानाजी विठ्ठल भोसले (रा. बोरखेड, ता. सेनगा) यास १० वर्षे सक्त कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. पट्टवारी यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला.
दादाहरी वडगाव (ता. परळी) येथील शिवशाला शेषराव इंगळे यांची मुलगी सुनीता हिचा गत दहा वर्षांपूर्वी तानाजीशी विवाह झालेला आहे. त्यानंतर चार वर्षांपासून तानाजी हा अमरावती जिल्ह्यात दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्यानंतर तो दीड महिन्यासाठी रजेवर आला होता. या दरम्यान त्याने त्याची पत्नी सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून तिला माहेरी पाठवले होते. यादरम्यान ३ मे २०१५ रोजी त्याची सासू शिवशाला इंगळे या एका ढाब्याच्या ठिकाणी स्वयंपाकासाठी गेल्या होत्या. यावेळी सुनीता घरी एकटीच होती. या रात्री १२ वाजेच्या सुमारास तानाजीसह एक अनोळखी इसम घरी गेला होता. तिथे त्याने सुनीतासोबत भांडण करून तिला मारहाण केली. शिवाय ‘तुझी आई कोठे आहे’ अशी विचारणा करत तो घराबाहेर पडला. नंतर सुनीताने फोनवरून ही माहिती तिच्या आई शिवशाला यांना कळवली होती. यादरम्यान तानाजी व त्याचा सोबती दुचाकीवरून शिवशाला काम करत असलेल्या ढाब्यावर पोहोचले. तिथे त्यांनी शिवशाला इंगळे यांना ‘पत्नीला नांदवण्यास का पाठवत नाहीत,’ असे म्हणत शिवीगाळ केली व त्याच्याजवळील पिस्तुलातून शिवशालाच्या दिशेने गोळी झाडली होती. समयसुचकता दाखवत बाजूला सरकल्याने त्या वाचल्या. दरम्यान गोळीचा आवाज ऐकून ढाब्यावरील इतर लोक जमा झाल्याने तानाजी व त्याचा साथीदार दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी शिवशाला इंगळे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण ठाण्यात तानाजी विठ्ठल भोसलेविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. पल्लेवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तपासी अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले. या प्रकरणाची सुनावणी अ. सत्र न्या. एम.बी. पट्टवारी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीस कलम 307 भादंविअंतर्गत दोषी धरून १० वर्षे शिक्षा व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.