सांगा, कसं होणार पोषण; एक लाखांपैकी ५१ हजार क्षयरोग्यांना मिळेना भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:18+5:302021-08-12T04:37:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक व आरोग्यासाठी लाभदायक आहार घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिलांना पोषण ...

सांगा, कसं होणार पोषण; एक लाखांपैकी ५१ हजार क्षयरोग्यांना मिळेना भत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक व आरोग्यासाठी लाभदायक आहार घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिलांना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. परंतु सध्या ॲक्टिव्ह असलेल्या १ लाख ३९२ रुग्णांपैकी केवळ ४९ हजार रुग्णांनाच भत्ता देण्यात आला आहे. अद्यापही ५१ हजार २९९ रुग्णांना भत्ता मिळालेला नाही. यातील ३० हजार रुग्णांनी खाते क्रमांकच दिलेला नाही. भत्ताच मिळाला नाही, तर पोषण कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य आजार आहे. फुफ्फूस व त्याव्यतिरिक्त इतर अवयवांना होणारा टीबी असे दोन प्रकार आहेत. खोकला, थुंकी व शिंकण्यातून तो जास्त प्रमाणात पसरतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, बेडक्यातून रक्त पडणे, सायंकाळी येणारा ताप ही टीबीची प्रमुख लक्षणे आहेत. एखादा रुग्ण टीबीमुक्त होण्यासाठी कमीत कमी ६ महिने कालावधी लागतो, तर औषधाला दाद न देणाऱ्या रुग्णाला टीबीमुक्त होण्यासाठी ९ ते २८ महिन्यांचा कालावधी लागतो. या काळात त्यांना आहार चांगला घेता यावा, यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना ५०० रुपये भत्ता दिला जातो. यासाठी निक्षय पोषण योजना आहे. परंतु रुग्णांकडून वेळेवर माहिती न देणे आणि कार्यालयांकडून उशिरा खाते क्रमांक अपलोड केल्याने रुग्णांना वेळेवर भत्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. हा भत्ता १०० टक्के देऊन रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
....
कोल्हापूर आघाडीवर, तर औरंगाबाद तळाला
राज्याचा आढावा घेतला असता, रुग्णांना भत्ता देण्यात कोल्हापूर मंडळ आघाडीवर आहे. या मंडळात एकूण रुग्णांपैकी ६८ टक्के रुग्णांना भत्ता दिला आहे. त्यापाठोपाठ अकोला व मुंबई मंडळ ५० टक्के, लातूर ५७ टक्के, नागपूर ५६ टक्के, पुणे ५२ टक्के यांचा क्रमांक लागतो. औरंगाबाद मंडळ सर्वात तळाला असून केवळ ४६ टक्के रुग्णांना आतापर्यंत भत्ता देण्यात आला आहे.
...
भत्ता देण्यात बीड जिल्हा राज्यात दि्वतीय
क्षयरोग्यांना भत्ता देण्यात बीड जिल्हा कोल्हापूरनंतर दुसऱ्यास्थानी आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह ८९९ रुग्णांपैकी ६९८ जणांना भत्ता दिला आहे. याचा टक्का ७८ आहे. २०२१ या वर्षात आतापर्यंत १५ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा निधी वाटप झाला आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी ही माहिती दिली, तर सर्वात कमी काम हे ठाणे महापालिकेचे (केवळ १८ टक्के) आहे.
---
आमच्याकडून रुग्ण शोधताच त्याची पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला पोषण आहार भत्ता देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचा खाते क्रमांक घेण्यासह प्रत्येक महिन्याला बोलावून घेत उपचार केले जातात. चालू वर्षात १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी वाटप केला आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन नोंद आहे.
- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड.