तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच
By Admin | Updated: December 4, 2014 00:55 IST2014-12-04T00:20:02+5:302014-12-04T00:55:00+5:30
आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले

तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच
आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत समित्याही नेमण्यात आल्या. आष्टी तालुक्यातील समित्यांना मरगळ आली असून या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात गावा दरम्यान समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्याअंतर्गत तंटामुक्त गावाऐवजी गावे तंटायुक्त होऊ लागली आहेत. शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे ही अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यात आष्टी, अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत सव्वादोन लाख लोकसंख्या आहे. स्थानिक पातळीवर शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच भांडण तंटे होऊ नयेत यासाठी तालुक्यातील १७७ गावात तंटामुक्ती समित्यांची नेमणूक केली आहे. या समितीकरीताही सुरुवातीला अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या अभियानाला मरगळ आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी एकाही गावात वाद मिटविण्याचे काम न केल्याने तंटामुक्त गावाऐवजी तंटायुक्त गाव अभियानच राबविले जात आहे.
अभियानांतर्गत शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन किंवा ठाणे हद्दीतील ठाणे प्रमुखाने गावात किमान आठवड्यातून एक दिवस जाऊन तंटामुक्ती समितीची बैठक घेणे अनिवार्य होते. असे असतानाही एकाही अधिकाऱ्याने या नियमाचे पालन केले नाही.
त्यामुळे या गावातील शेतीचे वाद, किरकोळ भांडणे, भाऊबंदकीचे वाद, घरगुती वाद या घटना गावात घडतच राहिल्या. त्यामुळे या अभियानाचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात तंटामुक्तीसाठी प्रभावी अभियान राबविण्यासाठी समित्यांची बैठक घेऊन पुन:संजीवनी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप, संजय खंडागळे यांनी केली आहे.
गत महिन्यातच तंटामुक्त गावांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील गावांचा समाधानकारक सहभाग नव्हता. तालुक्यात तंटामुक्त अभियान कार्यान्वीत करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते धडपड करीत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याचेही येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. (वार्ताहर)