जाब विचारल्यामुळे टांबीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:47+5:302021-02-08T04:29:47+5:30
बीड : लहान मुलांच्या सायकलच्या भांडणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका गॅरेज चालकास त्याच्याच चुलतभावाच्या मदतीने लोखंडी टांबीने जबर ...

जाब विचारल्यामुळे टांबीने मारहाण
बीड : लहान मुलांच्या सायकलच्या भांडणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका गॅरेज चालकास त्याच्याच चुलतभावाच्या मदतीने लोखंडी टांबीने जबर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली होती.
अंगद बाबूराव आडागळे (रा. शाहूनगर, बीड) असे मारहाण झालेल्या गॅरेज चालकाचे नाव आहे. सायंकाळी सहा वाजता त्यांचा ९ वर्षांचा मुलगा शंकर हा रडत घरी आला़ त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सायकल न दिल्यामुळे ऋषिकेश तावरेने मारहाण केली व सायकल आदळली असल्याचे सांगितले़ त्यामुळे मुलाला सोबत घेऊन ते ऋषिकेशकडे गेले व मारहाण का केली असा जाब विचारला़ तेव्हा रागारागाने ऋषिकेश दुचाकीवरुन निघून गेला. परंतु, रात्री साडेआठ वाजता अंगद यांचा चुलत भाऊ गणेश दिनेश आडागळे याने फोन करुन ऋषिकेश याला बोलावले असल्याचे सांगितले़
अंगद आडागळे हे काही कामानिमित्त कॅनॉल रोड परिसरात गेले असता त्यांचा चुलत भाऊ गणेश
आडागळे याने त्यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडले, ऋषिकेश तावरेने त्यांच्यावर टांबीने हल्ला केला. या हल्ल्यात भोवळ येऊन खाली पडल्यावर अंगद यांना गणेश याने रुग्णालयात नेण्याचा बनाव केला, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर ते स्वत: उपचारासाठी रुग्णालयात गेले, उपचार घेऊन परतल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी गणेश आडागळे व ऋषिकेश तावरे या दोघांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.