बॅंकेतील पैसे सांभाळा, ‘केवायसी’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:15+5:302021-07-21T04:23:15+5:30
प्रभात बुडूख बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, ...

बॅंकेतील पैसे सांभाळा, ‘केवायसी’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक
प्रभात बुडूख
बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, विविध प्रकारे बँकेसंदर्भातील माहिती विचारून घेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बँकेतील पैसे लंपास होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
मोबाइलवर अनोळखी फोनद्वारे अनेकांच्या बँक खात्यातली रक्कम गायब झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. यावेळी बँकेतून बोलत असून, तुमच्या खात्यासंदर्भात माहिती द्यावी असे सांगून त्यांच्या खात्यातून पैसे वळते करून घेतल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. या प्रकरणांचा तपास सायबर विभागाकडून केला जात असून, काही प्रकरणांत आरोपींना पकडण्यात त्यांना यशदेखील आले आहे. मात्र, अशा प्रकारे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वेळोवेळी बँक व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रकरण १
एका विद्यार्थिनीला ‘फोन पे’ या ॲपच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचा फोन आला होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने पैसे पाठविण्यासाठी येत असलेल्या अडचणी पुढील व्यक्तीला सांगितल्या. दरम्यान, त्याने सर्व माहिती विचारून घेत तिच्या खात्यावरून ४५ हजार रुपये वळते करून घेतले. हा कस्टमर केअर नंबर गुगलवरून त्या विद्यार्थिनीने घेतला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
प्रकरण २
तुमच्या बँकेतून बोलत आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आपले एटीएम कार्ड नंबर व बँक डिटेल्स पाहिजे असल्याची विचारणा करून एका शेतकऱ्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. बँकेत गेल्यानंतर खात्यावरील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
प्रकरण ३
विविध तीन बँकेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले होते. ही घटना बीड व अंबाजोगाई येथे घडली होता. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून ही रक्कम वळती कशी झाली, हे उघड झाले नाही. यासंदर्भात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.
गेलेले पैसे परत मिळणे कठीण
फोनद्वारे बँक डिटेल्स विचारून केलेल्या फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी संबंधितांना बँक, पोलीस ठाण्याच्या अनेक चकरा माराव्या लागतात. मात्र, या प्रकरणांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता नसते, तर एटीएम क्लोनिंग व इतर काही प्रकरणांत मात्र बँकेकडून पैसे परत मिळालेले आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर बँकेसंदर्भातील माहिती देऊ नये, तसेच नेट बँकिंगसंदर्भातील खात्याची माहितीदेखील गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बीड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.