कृषी विभागाचे आवाहन : पाच वर्षे असणार योजनेचा कार्यकाळ
बीड : केंद्र सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत ‘पीएमपीएफई’ ही योजना असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. ही योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. यासंदर्भातील सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील सीताफळ या उत्पादनाला मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया सामायिक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान ब्रॅंंडिंग व मार्केटिंगसाठी ५० टक्के अनुदान स्वयंसहायता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रति ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामध्ये शेतकरी उत्पादन संघ, कंपनी, संस्था, स्वयंसहायता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना सहभाग घेता येणार आहे. यासाठी एमआयएस पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी. मुळे यांनी केले आहे.