सुर्डी अत्याचार प्रकरणात कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:40+5:302021-07-20T04:23:40+5:30
बीड : माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष होत असेल तर ...

सुर्डी अत्याचार प्रकरणात कारवाई करा
बीड : माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठांनी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करावी. योग्यरितीने तपास न झाल्यास आम्ही त्या विरोधात आंदोलन उभारू, असे प्रतिपादन एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केले.
बीड येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कादरी बोलत होते. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक यांची उपस्थिती होती. डॉ. कादरी म्हणाले, माजलगाव तालुक्यात घडलेली घटना निंदनीय आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक केली. परंतु, त्यानंतर त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी पोक्सो हा कायदा आहे. या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना आरोपीला थेट न्यायालयीन कोठडी कशी काय मिळू शकते? असा आमचा प्रश्न आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी. या प्रकरणाचा सखोल तपास करून ती बाजू न्यायालयासमोर मांडावी. आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने योग्य दिशेने तपास होणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांची भेट घेतली असून, त्यांनी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. आम्ही या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. कादरी म्हणाले.
दरम्यान, यवतमाळ येथे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉ. कादरी यांनी केला. या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित केले असले तरी यातील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचे डॉ. कादरी म्हणाले. यावेळी एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.