महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘स्वाराती’ मराठवाड्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:52+5:302021-01-13T05:28:52+5:30
अंबाजोगाई : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मराठवाड्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘स्वाराती’ मराठवाड्यात अव्वल
अंबाजोगाई : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मराठवाड्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरले आहे. मराठवाड्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी तीन महाविद्यालये महानगरपालिका क्षेत्रात आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी डॉ. नितीन चाटे यांनी केल्यामुळे हा बहुमान मिळाला आहे.
शासनाकडून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार स्वामी रामानंद तीर्थ ग्रा.शा.वै.म., अंबाजोगाईने ३९०४ रुग्णांवर उपचार करून ७ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल उपलब्ध करून दिला, तर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने २३६६ रुग्णांवर उपचार करून ५ कोटी ११ लाख रुपयांचा, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १७५८ रुग्णांवर उपचार करून ३ कोटी ६२ लाख रुपयांचा, तर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १५९८ रुग्णांवर उपचार करून ४ कोटी ७५ लाख रुपयांचा महसूल उपलब्ध करून दिला आहे.
एप्रिल २०१७ पासून या योजनेचे नामकरण महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. नुकतेच या योजनेच्या शीर्षकात अंशत: बदल करून महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना असे नाव देण्यात आले. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ७५ टक्के रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून, फक्त २५ टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. स्वाराती रुग्णालयातील सर्जरी विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्याकडे सदरील योजनेच्या समन्वयकपदाची जबाबदारी असून त्यांच्या पुढाकाराने सातत्याने दुसऱ्या वर्षी या योजनेत स्वाराती रुग्णालय मराठवाड्यात अव्वल ठरले. गतवर्षी कोरोना साथीमुळे दैनंदिन शस्त्रक्रिया व रुग्णसेवा जवळजवळ सहा महिने बंद असूनही ही आकडेवारी रुग्णालयाच्या विविध विभागांच्या कार्यक्षमतेवर मोहोर उमटविणारी आहे.
कोट :
सर्वांच्या सहकार्यामुळेच सलग दोन वर्षे अव्वल
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख, तसेच निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या एकत्रित परिश्रमांमुळे दोन वर्षांत योजनेची व्यापकता वाढवून रुग्णसेवेच्या दर्जात सुधारणा करू शकलो आहोत. या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केलेल्या ३,९०४ रुग्णांपैकी १०५८ रुग्ण हे सर्जरी विभागातील आहेत, ही विशेष समाधानाची बाब आहे.
- डॉ. नितीन चाटे, सर्जरी विभाग प्रमुख तथा समन्वयक महात्मा फुले जीवनदायी योजना
रुग्णांना जीवनदान देता आले याचे समाधान
योजना अंमलबजावणीतील विक्रमी कामगिरीसह या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीमुळे कोरोनाविरोधी लढाईत ऑक्सिजन, रॅमडेसिवीर इंजेक्शन, पीपीई कीट, ग्लोव्हज् आदी अत्यावश्यक सामग्री तातडीने उपलब्ध करता आली व त्यामुळे कोविडच्या जागतिक लढाईत आपल्या संस्थेतील शेकडो रुग्णांना जीवनदान देता आले, याचा विशेष आनंद आहे.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय.