शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:09+5:302021-02-05T08:21:09+5:30
फोटो ०३बीईडीपी-२३ धनराज मोतीराम सपकाळ, ०३बीईडीपी-२४ धनराज याचा मृतदेह नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात आणला. त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी ...

शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
फोटो ०३बीईडीपी-२३ धनराज मोतीराम सपकाळ, ०३बीईडीपी-२४ धनराज याचा मृतदेह नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात आणला. त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
बीड : शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी नेकनूरजवळील रत्नागिरी (ता. बीड) येथे घडली. शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या गळ्यावर खुणा असल्यामुळे खून झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाणे प्रमुखांनी रत्नागिरी येथे धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
धनराज मोतीराम सपकाळ (वय ६, रा. रत्नागिरी, ता.बीड), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी १० वाजेदरम्यान गावातीलच शाळेत खेळण्यासाठी गेला होता. गावातीलच १० ते १२ मुले शाळेच्या आवारात खेळत होती. यावेळी अचानक धनराज सपकाळ दिसेनासा झाला. त्याचा शोध घेतला असता, शाळेच्या आवारातच तो निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टर घुले यांनी तपासून धनराज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धनराजच्या गळ्याभोवती हाताने आवळल्याच्या खुणा आहेत. यावरून त्याचा खून झाल्याचा आरोप कुटुंब आणि नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण डॉक्टर व पोलीस अधिकारी यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे नेकनूर ठाण्याचे प्रमुख सपोनि लक्ष्मण केंद्रे यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस गावात तळ ठोकून असून, पुढील तपास करीत आहेत.
मृत्यू झाल्याचे समजताच गावकरी गहिवरले
धनराज याचा मृतदेह नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात आणला, त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तेव्हा एकच टाहो फुटला. दरम्यान, नेकनूर पोलीस ठाणे गाठत हा खून असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.