भूलतज्ज्ञाला शिवीगाळ करणाऱ्या एसीएस राठोडला पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:58+5:302021-02-05T08:26:58+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञाला शिवीगाळ करणाऱ्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना वरिष्ठांकडून पाठीशी घातले जात ...

भूलतज्ज्ञाला शिवीगाळ करणाऱ्या एसीएस राठोडला पाठबळ
बीड : जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञाला शिवीगाळ करणाऱ्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना वरिष्ठांकडून पाठीशी घातले जात असल्याचे दिसत आहे. तक्रार करून ३२ दिवस उलटले तरी याची साधी चौकशीही केलेली नाही. शल्यचिकित्सक व उपसंचालक एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय भूलतज्ज्ञ डॉ. सय्यद अब्दुल शाफे यांची २२ ते २६ दरम्यान कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी होती. परत येऊन ते सामान्य रुग्णालयात रुजू झाले. यावर २९ डिसेंबर रोजी डॉ.राठोड यांनी संपर्क करून डॉ. शाफे यांना काेठे आहेस रे, असे म्हणत अरेरावी केली. यावर डॉ. शाफे त्यांना कक्षात जाऊन भेटले असता त्यांना पुन्हा अरेरावी करून शिवीगाळ केली. तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचे डॉ. शाफे यांनी २९ डिसेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाला ३२ दिवस उलटले तरी या प्रकरणात चौकशी करण्यासाठी साधी कमिटीही नियुक्त झालेली नाही. शल्यचिकित्सकांनी वरिष्ठ अधिकारी असल्याने उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागविले आहे, तर उपसंचालकांकडून आपल्यापर्यंत हे पत्र अद्याप आले नसल्याचे सांगण्यात आले. दोघांच्या टोलवाटोलवीत राठोड यांना अभय मिळत आहे. यानिमित्ताने कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठांवर कारवाई होत नाही, अशी चर्चा सुरू आहे. राठोड यांना आणखी किती दिवस अभय मिळणार हे वेळच ठरवेल.
कोट
डॉ.राठोड यांच्यासंदर्भात आलेल्या तक्रारीवर उपसंचालक यांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले नाही.
डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड
कोट
डॉ.राठोड यांच्यासंदर्भातील तक्रारीचा काहीच प्रकार माझ्यापर्यंत आलेला नाही. माझ्यासमोर अद्याप पत्र आले नाही.
डॉ.एकनाथ माले
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर
कोट
माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी तक्रार केली आहे. आता याची चौकशी करून न्याय द्यावा, एवढीच मागणी आहे. वरिष्ठांकडून काम करूनही कायम अशी अपमानाची वागणूक दिली जात आहे.
डॉ.सय्यद अब्दुल शाफे, तक्रारदार भूलतज्ज्ञ, बीड