जिल्हा सरचिटणीसपदी सुमित्रा आडसूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:18+5:302021-02-05T08:25:18+5:30
बीड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणाधिकारी कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी तुकाराम ...

जिल्हा सरचिटणीसपदी सुमित्रा आडसूळ
बीड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणाधिकारी कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर पार पडली. बैठकीमध्ये सुमित्रा आडसूळ यांची महिला आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सायस गिते, सिद्धिकी, निवृत्ती डोके, शेख मुसा, बिभीषण पाटील, अंकुश डाके, तात्यासाहेब मेघारे आदी उपस्थित होते.
घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिक त्रस्त
पाटोदा : शहरातील प्रमुख मार्गावरच न.पं.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बंदी तरीही विक्री
बीड : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरामध्ये अगदी सहजरित्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वाळू उपसा थांबवा
गेवराई : तालुक्यातील नदीकाठच्या गावांतून होणाऱ्या वाळू उपशावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील गंगावाडी-राजापूर येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक कोंडी
बीड : शहरातील मुख्य स्थळ असलेल्या अण्णा भाऊ साठे चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. दुचाकीधारक कोठूनही आणि कशाही प्रकारे वाहन नेत असल्यामुळे कोंडी होण्याबरोबरच अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.