सुकळी येथे शेतकऱ्यांनी मावेजासाठी रस्ता खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:15+5:302020-12-30T04:43:15+5:30
अंबाजोगाई- कळंब हा राज्य मार्ग पूर्वी युसूफ वडगावहून सुकळीमार्गे कळंबला जोडण्याचे नियोजन झाले होते. मात्र, मांजरा धरणाची निर्मिती झाल्याने ...

सुकळी येथे शेतकऱ्यांनी मावेजासाठी रस्ता खोदला
अंबाजोगाई- कळंब हा राज्य मार्ग पूर्वी युसूफ वडगावहून सुकळीमार्गे कळंबला जोडण्याचे नियोजन झाले होते. मात्र, मांजरा धरणाची निर्मिती झाल्याने सुकळी- गोटेगाव शिवारातून जाणारा हा रस्ता धरणाच्या पाण्याखाली जात असल्याने तो मार्ग बदलून युसूफ वडगावहून गोटेगाव- सुकळी असा रस्ता करण्यात आला. या ३ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी गोटेगाव व सुकळी येथील १८ शेतकऱ्यांची जवळपास ८ एकर २५ गुंठे (३३० गुंठे) जमीन संपादित करून रस्त्याचे काम पूर्ण केले होते. रस्त्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना आणखीही मावेजा मिळालेला नाही. जमिनीतून रस्ता गेला, मात्र आणखीही त्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरच आहेत. मावेजा मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी एक महिन्याच्या कालावधीत या रस्त्याची कागदपत्रे काढून शासनाकडे सादर करू, असे लेखी आश्वासन केजच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विलास कांबळे यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने पुन्हा संबंधित शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी आता रस्त्यासाठी दिलेल्या जमिनीचा मावेजा द्या अथवा हा रस्ता शासनाच्या मालकीचा आहे. याचे पुरावे सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावेत या मागणीसाठी सोमवारी या रस्त्यावर कब्जा करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी सोमवारी या मार्गावरील सुकळी येथे उतरून जमीन मालकीची आणि मालकीच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यावर आमचा हक्क आहे, अशी भूमिका घेऊन रस्त्यावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुन्हा आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी रस्त्यावर खोदकाम सुरू केले. शेतकऱ्यांनी मागण्यावर ठाम राहत डांबरीकरण रस्त्याच्या बाजूचा कच्चा रस्ता खोदून घेत रस्त्यावर थांबून होते. तहसीलदार आणि सा.बां. उपविभागाच्या अभियंत्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने उपअभियंता विलास कांबळे हे ठाण्यात बसून होते.
शेवटी आंदोलक शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतानासुद्धा तहसीलदार मेंडके यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून या रोडची कागदपत्रे, शेतकऱ्यांना त्यावेळी मावेजा दिला का नाही, याची शहानिशा करू अगर मावेजा मिळालेला नसेल तर भूसंपदनाचा प्रस्ताव तयार करून मावेजा मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे वचन दिल्यानंतर रात्री ८:३० वाजता आंदोलक शेतकरी रोडवरून उठले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी युसूफ वडगाव पोलिसांच्या वतीने दिवसभर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.