अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील नांदगाव तांडा येथील हरिभाऊ सखाराम पवार (वय ४५) या इसमाने राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हरिभाऊ पवार हे ऊसतोड कामगार आहेत. आज दुपारी त्यांनी घराची आतून कडी लावली आणि काही कळायच्या आत स्वतःला पेटवून घेतले. घराबाहेर बसलेल्या त्यांच्या पत्नीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले आणि दरवाजा तोडून हरिभाऊ पवार यांची आग विझविली. परंतु, तोपर्यंत ते ९० टक्के भाजले होते. गंभीर अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, त्यांनी कुठल्या कारणास्तव स्वतःला पेटवून घेतले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद बर्दापूर पोलिसात झालेली नव्हती.
अंबाजोगाईत ऊसतोड कामगाराचा जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:00 IST