बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडीतून काढून पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी मिळाली आहे. त्याच्या जप्त दोनपैकी एका मोबाइलचे लॉक उघडत नाही, तसेच इतरही टेक्निकल पुरावे हाती लागले असून, त्याचाही तपास सीआयडी करणार आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२३ रोजी अपहरण करून हत्या केली होती. यात सुदर्शन घुले, वाल्मीक कराडसह नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे. याच प्रकरणात वाहनांसह मोबाइल जप्त केले आहेत. यात घुलेच्या दोन मोबाइलचाही समावेश आहे. त्यातील एका मोबाइलचे लॉक उघडत नाही. त्यासह इतरही तपास करायचा असल्याने सीआयडीने घुलेच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. १० दिवसांची कोठडी मागितली होती. यात आरोपी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत त्याला ३१ जानेवारीपर्यंत कोठडी दिली आहे. इतर सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, बीडच्या कारागृहात आहेत. विष्णू चाटे हा लातूरच्या कारागृहात आहे.
कराडच्या उपचारावरून टीकावाल्मीक कराड याला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करत दमानिया यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले. त्यांचेे अंबाजोगाईत हॉटेल आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ते ओएसडी होते. बीडहून नाशिकला बदली झाल्यावर त्यांना पुन्हा आशीर्वाद देऊन बीडला आणल्याचा दावा त्यांनी केला, तर दुसऱ्या बाजूला डॉ. थोरात यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आपण २२ ते ३० जानेवारीपर्यंत रजेवर असून, बीड व परळीच्या डॉक्टरांसमवेत विदेशात आल्याचे सांगितले. याचे पुरावेही डॉ. थोरात यांनी माध्यमांना दिले आहे.
वाल्मीक कराडच्या जवळचे कोण?दमानिया यांनी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, कर्मचारी हे वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप केला आहे. २६ लोकांची यादीच त्यांनी व्हायरल केली आहे. या अगोदर एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा फोटो कराडसोबत व्हायरल झाल्याने एसआयटीसारखे पथक बरखास्त करण्यात आले होते.