वेळेचा असाही सदुपयोग..लसीकरणानंतर देतात आरोग्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:13+5:302021-09-05T04:37:13+5:30
अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना पंधरा मिनिटे थांबविण्यात येते. या पंधरा मिनिटांमध्ये कोणाला रिॲक्शन ...

वेळेचा असाही सदुपयोग..लसीकरणानंतर देतात आरोग्याचे धडे
अविनाश मुडेगावकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना पंधरा मिनिटे थांबविण्यात येते. या पंधरा मिनिटांमध्ये कोणाला रिॲक्शन अथवा चक्कर येते का? हे पाहणे गरजेचे असते. याच पंधरा मिनिटांच्या वेळेचा सदुपयोग करून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील लसीकरण विभागाचे समन्वयक डॉ. प्रशांत दहिरे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आरोग्याचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. वेळेचा सदुपयोग करून नागरिकांना आरोग्याविषयीचे मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सध्या लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. अनेकजण सध्या लसीकरण करण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. लसीकरण झाल्यानंतर केंद्रामध्ये वयोवृद्ध, युवक, महिला यांना पंधरा मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले जाते. जेणेकरून लसीकरणानंतर या सर्वांना रिॲक्शन येत नाही ना? हे पाहिले जाते. लसीकरण झाल्यानंतर या पंधरा मिनिटांमध्ये अनेकजण गप्पा मारत बसतात. तर बरेच जण मोबाईल बघत बसतात. त्यामुळे
या पंधरा मिनिटांचा सदुपयोग करण्याचा निर्णय स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी लसीकरण विभागाचे समन्वयक डॉ. प्रशांत दहिरे यांनी केली.
रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आरोग्य मार्गदर्शनाचे धडे देण्यास सुरुवात केली. कोरोनापासून बचाव, लसीकरणाचे फायदे, योगा व मानवी जीवन, दमा, मधुमेह, रक्तदाब, विविध आजार होऊ नयेत यासाठीच्या उपाययोजना व मार्गदर्शन यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दररोज १५ मिनिटांमध्ये दिली जात आहे. याकामी रुग्णालय व शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग घेऊन प्रबोधनाची ही आरोग्य चळवळ चालवत आरोग्य जनजागृती करीत आहेत.
...
...असा आहे उपक्रम
लसीकरण झाल्यानंतर सर्वांना खुर्चीवर बसविले जाते. त्यानंतर विविध विषयांचे विभाग प्रमुख व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित महिला व नागरिकांना मार्गदर्शन करतात. यशस्वी व निरोगी जीवन कसे जगावे त्यासाठीच्या आरोग्यविषयक टिप्स दिल्या जातात. सध्या कोरोनामुळे अनेक जण मानसिक तणावाखाली वावरत असतात. त्यांना आपण डिप्रेशनमध्ये गेलोय, हे समजत नाही. याबाबत ही सविस्तर माहिती दिली जाते. ज्या कोणाला आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या रुग्णास त्या त्या विभागात उपचारासाठी पाठविले जाते. आवश्यकतेनुसार आरोग्य विषयक सल्ले दिले जातात. अशा पद्धतीने त्या १५ मिनिटांचा सदुपयोग करून आरोग्य प्रबोधन व जनजागृतीची चळवळ दिशादर्शक बनली आहे.
040921\fb_img_1630695193465.jpg
लसीकरण विभागात १५ मिनिटात आरोग्य मार्गदर्शन