जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:20+5:302021-03-22T04:30:20+5:30
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ संचालकांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात ...

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे यश
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ संचालकांच्या जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. जाहीर झालेल्या निकालानुसार महाविकास आघाडीचे ५ उमेदवार विजयी झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक एकतर्फी करून दाखवत पुन्हा एकदा तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या डावपेचांना धक्का दिला. या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार घातला होता. तरीही शिवसेनेचा एक, अपक्ष १ आणि भाजपच्या आ. धस गटाला एका जागेवर यश मिळवता आले. विशेष म्हणजे महिला राखीव मतदारसंघात पंकजा मुंडे गटाच्या प्रयागा साबळे पराभूत झाल्या.
जिल्हा बँकेची निवडणूक अटीतटीची होईल असे सुरुवातीला चित्र होते. मात्र दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीत सेवा सोसायटी मतदारसंघातून एकही उमेदवार पात्र ठरला नाही. त्यामुळे १९ पैकी ८ जागांसाठी निवडणूक झाली. मतदानाच्या पूर्वसंध्येला पंकजा मुंडेंनी या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याची घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. शनिवारी निवडणुकीत ५८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी आपला हक्क बजावला. रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.
महिला राखीव मतदारसंघातून सुशीला शिवाजी पवार आणि कल्पना दिलीप शेळके या विजयी झाल्या. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून रवींद्र दळवी ७२० मते घेऊन विजयी झाले. या मतदारसंघात एकूण मतांची संख्या ८०५ होती. इतर शेती संस्था मतदारसंघात अमोल आंधळे २२३ मते घेऊन विजयी झाले. प्रक्रिया मतदारसंघातून भाऊसाहेब नाटकर हे ४२ मते घेऊन विजयी झाले. पतसंस्था मतदारसंघातून राजकिशोर मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले. तर इतर राखीव मतदारसंघातून कल्याण आखाडे हे ७१६ मतांनी विजयी झाले. भटक्या-विमुक्त मतदारसंघातून सूर्यभान मुंडे ७१० मते घेत विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निकाल जाहीर केला. त्यांना सहायक निवडणूक अधिकारी अशेका कदम व इतरांनी सहकार्य केले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलाल उदळून जल्लोष केला.
===Photopath===
210321\212_bed_12_21032021_14.jpg~210321\212_bed_11_21032021_14.jpg
===Caption===
जिल्हा बँकेतील विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी बोलताना माजी आ. अमरसिंह पंडित~जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी बोलताना माजी आ. अमरसिंह पंडित.