सुभाष रोड, मंडईत सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे? - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:46+5:302021-07-21T04:22:46+5:30
बीड : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आणि प्रचंड वर्दळीच्या सुभाष रोड, डीपी रोड, भाजी मंडई, बशीरगंज आणि सुभाष ...

सुभाष रोड, मंडईत सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे? - A
बीड : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आणि प्रचंड वर्दळीच्या सुभाष रोड, डीपी रोड, भाजी मंडई, बशीरगंज आणि सुभाष रोडने स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचा विषय बनला आहे. दर तासाला या भागात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा नसल्याने दुचाकी, चारचाकी रस्त्यांवरच दुकानांसमोर लावल्या जातात. एखादे वाहन थोडे जरी तिरपे चालले किंवा थांबले की, काही वेळातच निर्माण होणारी कोंडी २० ते ३० मिनिटांनंतर मोकळी होते. या वाहतूक कोंडीचा परिसरातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या गर्दीमुळे पायी जाताना कसरत करावी लागते. वाहतूक कोंडीमुळे या भागात धूर आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे. शहरातील या प्रमुख समस्येकडे लक्ष द्यायला यंत्रणेकडे मात्र वेळ नाही.
रोज हजारो लोकांची ये-जा
साठे चौक ते सुभाष रोड, सुभाष रोड ते डीपी रोड सहयोगनगर, भाजी मंडई भागात किराणा, कापड, रेडिमेड कपड्यांचे शोरूम, मोबाईल शॉपी, गृहोपयोगी साहित्य, जनरल स्टाेअर्सची दुकाने आहेत. त्यामुळे सकाळी बाजारपेठ उघडताच वाढणारी वर्दळ सायंकाळीच थंडावते.
फुटपाथ नाही, पार्किंगकडे दुर्लक्ष करीत बांधकामांना परवानगी या रस्त्यावर सुरळीत वाहतुकीसाठी पी वन, पी टू पार्किंगचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, महिनाभरातच हा प्रयोग फोल ठरला. बांधकामांना परवानगी देताना पार्किंगच्या विषयाकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडीची सूज वाढली आहे. या रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी वेगळा पर्यायी मार्गदेखील नसल्याने त्यांना ताटकळावे लागते.
अतिक्रमण हटाव दाखवायलाच
बीड शहरातील सुभाष रोड, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर तसेच भाजी मंडई रस्त्यावर, बशीरगंज, कारंजा भागात दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. कोर्टाचे फर्मान आल्याशिवाय किंवा अनुपालन केल्याचा दिखावा करण्यासाठी नगर पालिकेमार्फत वर्षातून तीन ते चार वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते. मोहीम संपताच काढलेली अतिक्रमणे पुन्हा थाटली जातात.
पायी चालायला भीती वाटते
भाजी मंडईत व्यापारी पेठ आहे. शाळा आहे. मात्र, भाजी खरेदी करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडीमुळे लागतो. कोरोनामुळे तोंडाला मास्क असतो. परंतु गर्दीमुळे काढता येत नाही आणि मोकळा श्वास घेता येत नाही. मंडईत चार चाकी वाहनांना
प्रतिबंध घालावा. --- अनिल अष्टपुत्रे, बीड.
सुभाष रोड असो किंवा बशीरगंज, शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर माणसांच्या तुलनेत दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांची गर्दी जास्त असते. वाहनांसाठी पार्किंगची सोयही नाही. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांमुळे खरेदीसाठी जातानाही कसरत करावी लागते. ---- किशोर गायकवाड, बीड.
नियमांचे पालन केल्यास टळेल कोंडी
नागरिकांनी आपली वाहने शिस्तीमध्ये लावल्यास रस्त्यांवरील कोडी होणार नाही. आमचे कर्मचारी वेळोवेळी वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच दोषींवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करतात. योग्य पार्किंगसाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही.
--कैलास भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस शाखा प्रमुख, बीड.
200721\20_2_bed_1_20072021_14.jpeg
वाहतूक कोंडी