आष्टी, पाटोदा, गेवराई तालुक्यांत कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:44+5:302021-07-18T04:24:44+5:30
बीड : तिसऱ्या कोविड लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी होत नाही, अशा तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू ...

आष्टी, पाटोदा, गेवराई तालुक्यांत कडक निर्बंध
बीड : तिसऱ्या कोविड लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी होत नाही, अशा तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने शासन निर्देशानुसार आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यांत सर्व दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुषार ठोंबरे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. दुसरी लाट जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आटोक्यात आली आहे, तर तीन तालुक्यांसाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना इशारा मानला जात आहे.
या तीन तालुक्यांमध्ये दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नऊ तास अशी होती. आता या तालुक्यांत आवश्यक असलेल्या सेवा सोमवार ते रविवार या दिवशी साळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुरू राहतील, तर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व व्यापारी आस्थापना या सोमवार ते शुक्रवार या दिवशीच सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व व्यापारी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.
कारवाईसाठी फिरती पथके
विनामास्क रस्त्यांवर फिरणारे नागरिक आणि वेळेनंतरही दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकनदारांवर योग्य ती प्रभावी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने तहसील पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी असलेली फिरती पथके कार्यान्वित केली असून, दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--------
घरी राहणाऱ्या रुग्णांची माहिती कळवा
कोणत्यही परिस्थितीत कोविड-१९ बाधित रुग्ण गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) राहण्याची परवानगी देता येणार नाही, असे यापूर्वीच सर्व आरोग्य यंत्रणा व क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कोणताही कोविड-१९ बाधित रुग्ण जर त्याच्या घरी राहत असेल, तर त्याबाबतची सूचना जिल्हा अथवा तालुका प्रशासनाला स्थानिक अधिकाऱ्यांनी द्यावी.
----------
दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती उपाययोजना करताना नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियामांबाबत योग्य वर्तन करून प्रशासनाला सहकार्य करावे. मास्कचा अधिकाधिक वापर करावा, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. त्याचबरोबर लग्न समारंभ व अंत्यविधीसारख्या प्रसंगांमध्ये असलेली मर्यादा काटेकोरपणे पाळावी.
-तुषार ठोंबरे, जिल्हाधिकारी, बीड
----------