कान्होबाची वाडीत सरळ तर कोळवाडीत तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:13+5:302021-01-08T05:49:13+5:30
शिरूर कासार : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा सोमवारी पार पडल्यानंतर ...

कान्होबाची वाडीत सरळ तर कोळवाडीत तिरंगी लढत
शिरूर कासार : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा सोमवारी पार पडल्यानंतर आता ही लढाई जिंकायची तयारी सुरू झाली असून ग्रामपंचायतच्या आखाड्यात कोळवाडीमध्ये तिरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात दोन अनुभवी पॅनलबरोबर लढा देण्यासाठी एका नवख्या पॅनलने कंबर बांधली आहे. तीन पॅनलने आपल्या ग्रामदैवताचे नाव दिले असून आता ही लढत जय हनुमान, जय बजरंगबली व कोळाई ग्रामविकास नावांचा आधार घेत आहे. ८३५ मतदार असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सात सदस्यांसाठी १८ उमेदवार सज्ज झाले आहेत. सरपंच पद हे ओबीसीला सुटेल असे गृहीत धरून तीनही पॅनल निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.
कान्होबाची वाडी ग्रामपंचायत निवडणूक सरळ सरळ दोन पॅनलमध्ये रंगणार आहे. दोन्ही कमी-अधिक अनुभवी असल्याने लढत रंगतदार होणार आहे. सात जगांसाठी १४ इच्छुक आहेत. शहराच्या जवळ कोळवाडी आणि कान्होबाची वाडी ही दोन्ही गावे असल्याने या निवडणुकीकडे त्या गावाबरोबर शहराचेदेखील लक्ष लागून आहे.
ग्रामपंचायत गावस्तरावर सत्तास्थानी येत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व आले आहे. निवडणूक जिंकायचीच या ईर्षेपोटी आता सर्व उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करण्यात व्यस्त झाले आहेत. मतदारांची जुळवाजुळव करण्यासाठी तसेच बाहेर गेलेल्या मतदारांना मतदानासाठी आणावे लागणार, याचीदेखील तयारी सुरू आहे.