गायरान जमीन नावावर करण्यासाठी आष्टीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:37+5:302021-07-24T04:20:37+5:30
आष्टी : तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर अद्यापपर्यंत जमीन केली नाही. ही जमीन ...

गायरान जमीन नावावर करण्यासाठी आष्टीत रास्ता रोको
आष्टी : तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर अद्यापपर्यंत जमीन केली नाही. ही जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, भूमिहीन प्रवर्गातील अतिक्रमणधारकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी तहसीलसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार शारदा दळवी, नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांनी आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. २३ जुलै रोजी दुपारी १ वाजता आष्टी तहसील कार्यालयांवर गायरान जमीन नियमित करून सातबारा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आष्टी तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमणधारकांचे अनेक वर्षांपूर्वीचे अतिक्रमण असून ते शेती करत असताना त्यांच्या नावावर शेती करण्यात आलेली नाही. यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा मोर्चे, आंदोलने, धरणे, रास्ता रोको करण्यात आले. परंतु, शासन या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीसाठी केलेली ही अतिक्रमणे नियमित करावी, अन्यथा एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यशवंत खंडागळे यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी पाटोदा वंचितचे नेते गोरख झेंड, तालुकाध्यक्ष ग्यानबा साळवे, बाळासाहेब घाटविसावे, सुदाम थोरात आदी उपस्थित होते.
230721\img-20210723-wa0320_14.jpg