: फुले विद्यालयात ऑनलाइन मार्गदर्शन
माजलगाव : मासिक पाळी येण्यापूर्वी शरीर रचनेत होणारे बदल, संप्रेरकाच्या कमीजास्त होण्यामुळे होणारी मानसिक घालमेल या गोष्टी सहजतेने घेऊन मोकळेपणाने तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. या काळातील शारीरिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात संपूर्णपणे आहार व आराम याबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अरुंधती सुजित कुलकर्णी यांनी केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयाच्या आभासी व्यासपीठावर डॉ. कुलकर्णी यांनी आपले मत व्यक्त केले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रभाकर साळेगावकर होते.
प्रारंभी सातवीची विद्यार्थिनी अश्विनी घडसे हिने मासिक पाळी मैत्रीण... हे गीत सादर केले. २८ मे ते ५ जून या काळात मासिक पाळी समुपदेशन व स्वच्छता आठवडा साजरा होत आहे.
त्या अनुषंगाने विद्यार्थिनींचा एक व्हॉट्सॲप समूह तयार करून तिथे गुगल मीटची लिंक देणाऱ्या शिक्षिका अर्चना भाले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
आपल्या मनोगतामध्ये माता पालक, विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. अरुंधती यांनी दिली. आरोग्य, काळजी, होणारा त्रास यावर मनमोकळेपणाने मुली व्यक्त झाल्याने कार्यक्रम संयोजनाचा उद्देश सफल झाला.
अध्यक्षीय समारोपात प्रभाकर साळेगावकर यांनी वाढत्या किशोर वयात मुलींनी जंकफूड टाळले पाहिजे. शाळेतल्या बाई व घरातली आई मैत्रीण होऊन शारीरिक बदलातील मुलींची भावनिकता समजावून घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
महात्मा फुले विद्यालयातील शिक्षिकांनी याचे संयोजन केले. मुली व माता पालक यांची ऑनलाइन उपस्थिती होती. ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीने आभार मानले.