एसपींच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:24+5:302021-03-24T04:31:24+5:30

पुरुषोत्तमपुरीत ३ टिप्पर, एक जेसीबीसह १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त माजलगाव : तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून दररोज ...

SP's squad cracks down on sand mafias | एसपींच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई

एसपींच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई

पुरुषोत्तमपुरीत ३ टिप्पर, एक जेसीबीसह १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

माजलगाव : तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून दररोज वाळू माफिया अवैधरित्या वाळू चोरी करीत असल्याने मंगळवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पुरुषोत्तमपुरी येथील नदीपात्रात धाड टाकून अवैधरित्या वाळू भरणारे ३ टिप्पर व १ जेसीबीसह १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या हायवापैकी एक हायवा पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यात २४ गावे वाळूसाठा उपलब्ध असलेली आहेत. परंतु लिलावापेक्षा वाळूच्या चोरट्या तस्करीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्त पैसा मिळत आहे. तालुक्यातील ३ वाळूघाटांचा लिलाव होऊनही ते सुरूच नसल्याने माफियांकडून गंगामसला, बोरगाव, पुरुषोत्तमपुरी, आबेगाव, रिधोरी, गव्हाणथडी यांसह अनेक ठिकाणांहून वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र, स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कुठलीही कारवाई न करता अभय देण्यात येत होते. याबाबत लोकमतने रविवारी हॅलो बीड आवृत्तीमध्ये ‘वाळूच्या चोरट्या धंदयाने डोके काढले’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास हजारे यांच्या टीमने मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुरुषोत्तमपुरीत थेट गोदापात्रात कारवाई केली. तेथे वाळू उपसा करीत असलेले जेसीबी, वाळूसह तीन टिप्पर असा १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टिप्परवर नंबरदेखील खोडलेले आढळून आले. याप्रकरणी आरोपी शेख बशीर शेख चांद व इतर तीन यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात वाळूची चोरी महसूल-पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या पथकाला कारवाई करण्याची वेळ आली. मंगळवारी नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याचे पोलीस कर्मचारी सांगताना दिसत होते. त्यावरून पोलिसांचा सहभाग दिसून आला आहे. तर मागील महिन्यात खुद्द उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीकांत गायकवाड यांनाच वाळूसाठी ६५ हजारांची लाच घेताना पकडले होते.

===Photopath===

230321\purusttam karva_img-20210323-wa0027_14.jpg~230321\23bed_19_23032021_14.jpg

===Caption===

माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी धाड टाकून वाळूने भरलेले तीन  टिप्पर, एक जेसीबी असा मुद्देमाल जप्त केला.~रविवारी २१ मार्च रोजी हॅलो बीड आवृत्तीमध्ये ‘वाळुच्या चोरट्या धंदयाने डोके काढले’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. 

Web Title: SP's squad cracks down on sand mafias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.