‘स्पीडगन व्हॅन’ने रोखला ८ हजार ७५७ वाहनांचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:14+5:302021-02-05T08:28:14+5:30

बीड : जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांकडून काही अंतरावर स्पीडगन व्हॅन उभा केलेल्या आहेत. महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा ही ताशी ८० इतकी ...

The speedgun van stopped the speed of 8,757 vehicles | ‘स्पीडगन व्हॅन’ने रोखला ८ हजार ७५७ वाहनांचा वेग

‘स्पीडगन व्हॅन’ने रोखला ८ हजार ७५७ वाहनांचा वेग

बीड : जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांकडून काही अंतरावर स्पीडगन व्हॅन उभा केलेल्या आहेत. महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा ही ताशी ८० इतकी आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांवर स्पीडगन व्हॅनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. मागील वर्षभरात ‘स्पीडगन’ने ८ हजार ७५७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर-धुळे व कल्याण-विशाखापट्टणम या दोन महामार्गाचे काम पूर्ण झाल्यापासून वेगमर्यादेचे नियम डावलून वाहने धावत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनांवरील ताबा सुटून अपघात झाल्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत. दरम्यान, वाहनांच्या वेगावर निर्बंध असावेत यासाठी महामार्ग पोलिसांकडून स्पीडगन व्हॅनच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यामध्ये जर महामार्गावरील वाहन हे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने असते तर, स्पीडगनद्वारे त्या वाहनांचा नंबर व गती नोंद केली जाते. तसेच ऑनलाइन संबंधित वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली जाते. यामुळे महामार्गावर स्पीडगन दिसताच अनेक वाहनांची वेगमर्यादा कमी होते. त्यामुळे सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर निर्बंध आले असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात महामार्ग पोलिसांकडे स्पीडगन व्हॅन आहे. इतर पोलीस ठाणे किंवा वाहतूक शाखेकडून मात्र स्पीडगन जुनी झाल्यामुळे कारवाया केल्या जात नाहीत. महामार्ग पोलिसांकडून मात्र कारवाया दररोज केल्या जात असून, मागील वर्षभरात ८ हजार ७५७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून १ कोटी ४७ लाख ५४ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या वेगमर्यादेचे नियम सर्वांनी पाळावेत व दंडात्मक कारवाई तसेच अपघात होण्याच्या शक्यतेपासून बचाव करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

महिना कारवाई

जानेवारी ५३२६

फेब्रुवारी २१२७

मार्च १६४०

एप्रिल ५४

मे ६५२

जून १७४८

जुलै १९३८

ऑगस्ट १८४६

सप्टेंबर १५६४

ऑक्टोबर १७५९

नोव्हेंबर ४४५३

डिसेंबर ५२६३

१ किलोमीटर अंतरावरील वाहनांचा मोजला जातो वेग

महामार्गावर अतिवेगात असलेल्या वाहनांचा वेग १ किलोमीटर अंतरापर्यंत मोजला जातो. वेगमर्यादा ओलांडली असेल तर ‘स्पीडगन’द्वारे त्या वाहनांचा व्हिडीओ आणि फोटो संपादित केले जातात. ते सर्व संपादन मुंबई येथे पाठवण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन चालान होते व आरसी नंबरवरून तो दंड आकारला जातो. दरम्यान, ही दंडाची रक्कम १५ दिवसांत भरण्यासंदर्भात संबंधिताला संदेश पाठवला जातो.

दोन्ही महामार्गांवर कोणत्याही ठिकाणी ‘स्पीडगन व्हॅन’ उभी केली जाते. तसेच ज्या ठिकाणी वेग वाढण्याची शक्यता जास्त असते त्या ठिकाणी वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी कारवाया केल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षीपेक्षा अपघाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करावे.

- प्रवीणकुमार बांगर, महामार्ग पोलीसप्रमुख, बीड

Web Title: The speedgun van stopped the speed of 8,757 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.