उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:13+5:302021-07-08T04:23:13+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबाजोगाई - अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या ...

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबाजोगाई - अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व जातीवर शिव्या दिल्या. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी बुधवारी दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. अंबाजोगाई शहरातील डॉ.यादव यांना या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यादव कुटुंबीयांचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मंगळवारी रात्री या प्रकरणाचा तपास करताना येथील विलास यादव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली व त्यांना जातीवर शिव्या दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हे जाणीवपूर्वक यादव कुटुंबीयांना त्रास देत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी बुधवारी दुपारी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले व आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे अॅड.माधव जाधव, गोविंद देशमुख, प्रशांत जगताप, बालाजी शेरेकर, रविकिरण देशमुख, अंगद गायकवाड, धर्मराज सोळंके, प्रशांत आदनाक, लहू शिंदे, बाळासाहेब शिंदे, अभिजीत लोमटे, संतोष मोहिते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
070721\img-20210707-wa0070.jpg
मराठा क्रांती मोर्चाचे उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन