अंबाजोगाईत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:40+5:302021-07-11T04:23:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या पोलीस उपअधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शनिवारी चौथ्यादिवशीही सुरूच ...

अंबाजोगाईत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या पोलीस उपअधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शनिवारी चौथ्यादिवशीही सुरूच राहिले. जोपर्यंत जायभाये यांची बदली होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनाचे समन्वयक ॲड. माधव जाधव यांनी सांगितले.
औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे शुक्रवारी रात्री अंबाजोगाईत आले होते. यावेळी त्यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तब्बल चार तास या प्रकरणावर चर्चा केली. या प्रकरणातील मूळ फिर्यादी महिला, डीवायएसपी जायभाये, कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आलेले ॲड. माधव जाधव, ॲड. संतोष लोमटे, ॲड. अजित लोमटे यांची बाजू त्यांनी समजून घेतली. संपूर्ण चौकशी करून सोमवारपर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. तरीही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत.
.....
यांनी दिला आंदोलनास पाठिंबा
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आ. पृथ्वीराज साठे, प्रा. टी. पी. मुंडे, शिवाजी ठोंबरे, विजय दराडे (माजलगाव), धम्मपाल कांबळे, गोविंदराव शिनगारे (केज), दगडू लोमटे, प्रा. भगवान शिंदे, सोलापूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे हर्षल बागल, संभाजी घाडगे (बार्शी), शोभा घुटे, श्रीरंग चौधरी यांच्यासह विविध पक्ष व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. छावा संघटनेनेही पाठिंबा दिला. शुक्रवारी तळेगाव घाट, हातोला आणि बर्दापूर येथील, तर शनिवारी पिंपळा धायगुडा, जवळगाव, मगरवाडी, पुस, गिरवली, वरवटी येथील मराठा समाज बांधव, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. रविवारी वाघाळा, मुडेगाव, राडी, वाघाळवाडी, दैठणा या गावचे मराठा समाज बांधव, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
.....
चौकशी अहवालानंतर कारवाई
संबंधित अधिकाऱ्याला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी समज दिली आहे. लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल आणि त्याआधारे कारवाई केली जाईल, असे अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.
....
राडी येथे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहका-यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तीचा निषेध करून राडी येथे मराठा समाज बांधवांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
....
100721\20210710_160949.jpg
अंबाजोगाईत सुरू असलेल्या आंदोलनास प्रा टी पी मुंडे यांनी पाठींबा दिला