साहेब, आम्हाला म्हैस दूध काढू देत नाही, माझ्या नवऱ्याला घरी सोडा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:49+5:302021-07-13T04:07:49+5:30
सोमनाथ खताळ बीड : आम्ही शेतकरी आहोत. कुठून कोरोना आला काय माहिती. त्रास नसतानाही नवऱ्याला चार दिवसांपासून बांधल्यागत ठेवलंय. ...

साहेब, आम्हाला म्हैस दूध काढू देत नाही, माझ्या नवऱ्याला घरी सोडा - A
सोमनाथ खताळ
बीड : आम्ही शेतकरी आहोत. कुठून कोरोना आला काय माहिती. त्रास नसतानाही नवऱ्याला चार दिवसांपासून बांधल्यागत ठेवलंय. आम्हाला म्हैस दूध काढू देत नाही, त्यांना घरी सोडा, लेकरांच्या दुधाचा प्रश्न हाय, अशा प्रकाराचे विविध कारणे सांगून नातेवाईक हे कोरोनाबाधितांना घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच काही लोक खोटे बोलत असून, सीसीसी रुग्णालयात दाखल होण्यास अनुत्सुकता दाखवित आहेत.
जिल्ह्यात मे महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. परंतु आता जुलै महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तसेच यापूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २० मे रोजी आदेश काढत कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन बंद केले. त्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येकाला संस्थात्मक विलगीकरण अथवा कोविड सेंटर व रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक केले आहे. परंतु, बहुतांश लोकांना लक्षणे नसतात व काही त्रासही जाणवत नाहीत. असे असल्यामुळे त्यांच्याकडून सीसीसीमध्ये राहण्यास नकारघंटा येते. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठीही नातेवाईक वेगवेगळी शक्कल लढवित असल्याचे समोर आले आहे. परंतु, नियमाप्रमाणे दहा दिवस त्यांची सुटका केली जात नसल्याचे सांगण्यात आले.
रुग्णही सांगतात ही कारणे
घरी थांबण्यासाठी खोटे बोलतात
अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना नियंत्रण कक्षातून संपर्क केला जातो. यावर ते आपण खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगतात. प्रत्यक्षात ते घरीच असतात. उलटतपासणी केल्यावर ते कोविड सेंटर अथवा रुग्णालयात दाखल झालेले नसतात. खोटे बोलून घरी राहण्यासाठी हा खटाटोप काही लोक करत आहेत. असे प्रकार नियंत्रण कक्ष व काही टीएचओंशी संवाद साधल्यानंतर समजले.
किस्सा क्रमांक १
पाटोदा तालुक्यातील एक फौजी दिल्ली येथे आरटीपीसीआर चाचणी करून गावी आला. रस्त्यात असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. त्याची पोर्टलवर नोंद होताच आरोग्य विभागाने संपर्क केला. यावर त्याने मला दिल्लीमधून गोळ्या दिल्या आहेत. मला कसलाही त्रास नाही. मी घरीच थांबतो, असे सांगत सीसीसीमध्ये येण्यास नकार दिला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर. तांदळे यांनी संपर्क करून समुपदेशन करताच हा फौजी सीसीसीमध्ये दाखल झाला. हा किस्सा पाटोदा तालुक्यातील आहे.
किस्सा क्रमांक २
आमच्या घरातील सर्वच लोक पॉझिटिव्ह आलो आहेत. कोविड सेंटरमध्ये आम्हाला करमणार नाही. त्यामुळे आम्ही घरीच थांबलो आहोत. आम्ही आमच्या ओळखीच्या खासगी डॉक्टरांच्या संपर्कात असून, त्यांच्या सांगण्यानुसार औषधी घेत आहोत. हा प्रकार बीड शहरात घडला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
किस्सा क्रमांक ३
पाटोदा तालुक्यातील एका गावातील सुशिक्षित कुटुंबातील एक सदस्य पॉझिटिव्ह आला. त्याला आरोग्य विभागाने संपर्क करून सीसीसी अथवा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. यावर या रुग्णाने आपला पुतण्या एमबीबीएस डॉक्टर आहे. तो म्हणाला की मला काही त्रास नाही. तुम्ही घरीच थांबा. मी आता नाही ॲडमिट होणार असा हट्ट धरला. यावर टीएचओ डॉ. तांदळेंनी नियमांचा डोस देताच हा व्यक्ती धावत सीसीसीमध्ये दाखल झाला.