आंथरवन पिंप्रीत हवेत गोळीबार; दोन गट भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:19+5:302021-08-28T04:37:19+5:30
बीड शहरातील सावता माळी चौकातील प्लायवूडच्या दुकानात कामाला असलेल्या एका मुलाचे गुरुवारी किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ...

आंथरवन पिंप्रीत हवेत गोळीबार; दोन गट भिडले
बीड शहरातील सावता माळी चौकातील प्लायवूडच्या दुकानात कामाला असलेल्या एका मुलाचे गुरुवारी किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अंथरवन पिंप्री येथील तांड्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही माहिती पोलिसांना समजताच सपोनि बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक ढाकणे यांनी गावात धाव घेतली. त्यामुळे काही प्रमाणात वाद मिटला. परंतु त्याअगोदरच हाणामारीमुळे दोन्ही गटाचे लोक जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बीडमधील एमआयडीसीत राहणाऱ्या वाघमारे नामक युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आला आहे. गोळीबार झाल्याचे ग्रामस्थ सांगत असले तरी पोलिसांनी असे काहीही घडले नसल्याचा दावा केला आहे. जप्त केलेले पिस्तूल हे बनावट असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेने मात्र, खळबळ उडाली असून, ग्रामस्थ भयभीत आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.