धक्कादायक : रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण आला बार्शी रोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:34+5:302021-03-08T04:31:34+5:30
स्टींग ऑपरेशन सोमनाथ खताळ बीड : साधारण ३५ ते ४० वर्षे वय असलेली व्यक्ती. हाताला सलाईन लावलेला पॉईंट. डौलत ...

धक्कादायक : रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण आला बार्शी रोडवर
स्टींग ऑपरेशन
सोमनाथ खताळ
बीड : साधारण ३५ ते ४० वर्षे वय असलेली व्यक्ती. हाताला सलाईन लावलेला पॉईंट. डौलत डौलत गेटमधून बाहेर पडली, ती थेट बार्शी रोडवर जाऊन थांबली. एक पिशवी हातात घेऊन १५ मिनिटांनी परतली आणि पुन्हा कोरोना वाॅर्डमध्ये गेली. हा प्रकार रविवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास समोर आला. येथील अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांपुढे उत्कृष्ट नियोजनाचा देखावा केला जातो. यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश झाला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून निर्बंध घातले जात आहेत. परंतु याच प्रशासनाकडून कसलेच नियोजन केले जात नसल्याचे समाेर आले आहे. जिल्हा रुग्णालयात अगोदरच सुविधा आणि वेळेवर उपचार होत नसल्याची ओरड आहे. तसेच मृत्यूदरही झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता नियोजन आणि नियंत्रणही करण्यात जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी अयशस्वी झाल्याचे रविवारी समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण सर्रासपणे बाहेर येऊन नातेवाईकांशी गप्पा मारतात. जेवणाचे डबे, तंबाखू, गुटखा घेऊन आतमध्ये जातात. या सर्व परिस्थितीवरून जिल्हा रुग्णालयातूनच कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. एवढी गंभीर बाब असतानाही आरोग्य प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी बाहेर फिरला म्हणून गुन्हा दाखल
गतवर्षी आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित कुटुंब येथे सुविधा मिळत नसल्याची तक्रार करून पुण्याला निघाले होते. परंतु, रुग्णवाहिकेला वेळ असल्याने त्यातील एक जण पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी प्यायला. होता. यात प्रशासनाकडून त्या व्यक्तीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतु आता राजरोसपणे बाधित रुग्ण बाहेर फिरताना दिसतात. परंतु त्यांच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही.
पोलीस गायब, सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये व्यस्त
कोरोना रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक व पोलिसांची नियुक्ती केलेली आहे. परंतु रविवारी एकही पोलीस कर्मचारी येथे दिसला नाही. तसेच सुरक्षारक्षकही बाजुला खुर्ची टाकून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसले. यावरून सुरक्षा व्यवस्था किती गाफील आहे, याची प्रचिती येते.
सीएस, एसीएस ढिसाळ कारभार
जिल्हा रुग्णालयातील सर्व नियोजन करण्याची जबाबदारी ही अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची आहे. या संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांची आहे. परंतु हे दोघेही कायम एकमेकांकडे बोट दाखवितात. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. शिवाय सामान्यांनाही त्रास होत आहे.
कोट
कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असेल तर ही गंभीर बाब आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना बोलून तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना केल्या जातील. याची पूर्ण चौकशी करून तत्काळ कारवाई केली जाईल.
अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., बीड