'ती' असुरक्षित ! आठ महिन्यांत ९८ महिला वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST2021-09-17T04:40:29+5:302021-09-17T04:40:29+5:30

बीड : महिला अत्याचाराच्या किळसवाण्या आणि घृणास्पद घटनांची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही. घराबाहेर आणि उंबऱ्याच्या ...

'She' is insecure! 98 women lust victims in eight months | 'ती' असुरक्षित ! आठ महिन्यांत ९८ महिला वासनेच्या शिकार

'ती' असुरक्षित ! आठ महिन्यांत ९८ महिला वासनेच्या शिकार

बीड : महिला अत्याचाराच्या किळसवाण्या आणि घृणास्पद घटनांची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही. घराबाहेर आणि उंबऱ्याच्या आतही 'ती' सुरक्षित नसल्याचे वास्तव पोलीस दप्तरी नोंद असलेल्या अत्याचाराच्या आकडेवारीतून उजेडात आले आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत सुमारे ९८ महिला विकृत मानसिकतेच्या शिकार ठरल्या आहेत.

कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा वर्षाच्या सुरुवातीला काही महिने कडक निर्बंध लागू होते. मात्र, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होण्याआधी वाढ झाली आहे. बहुतांश प्रकरणांत आरोपी हे पीडितेच्या ओळखीतले आहेत. आमिष दाखवून तसेच पळवून नेऊन अत्याचार केल्याची प्रकरणे अधिक आहेत. विशेष म्हणजे विनयभंगाचा आकडाही थक्क करणारा आहे. चालू वर्षी आठ महिन्यांत विनयभंगाचे सुमारे २६८ गुन्हे नोंद आहेत. यात अल्पवयीन मुलींची संख्या २५ आहे. महिला अत्याचाराला पायबंद घालण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर आहे.

.....

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

जिल्ह्यात गतवर्षी २०२० मध्ये ऑगस्ट महिन्याअखेरीस लैंगिक अत्याचाराच्या ८१ घटनांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा ९८ इतका झाला आहे. विनयभंगाचे गतवर्षी आठ महिन्यांत २०८ गुन्हे नोंद होते. यंदा त्यात ६०ने भर पडली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अत्याचार वाढल्याचे यातून स्पष्ट होते.

...

....

जिल्ह्यातील आकडेवारी

महिना २०२० २०२१

जानेवारी ०७ १२

फेब्रुवारी १३ १०

मार्च ०९ १८

एप्रिल ०५ १२

मे ९० १०

जून ११ ०६

जुलै १६ १९

ऑगस्ट ११ ११

....

५६ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

आठ महिन्यांतील एकूण अत्याचाराच्या ९८ प्रकरणांपैकी सुमारे ५६ प्रकरणांत अल्पवयीन मुली पीडित आहेत. गतवर्षी ८१ पैकी ५५ मुली वासनेच्या शिकार ठरल्या होत्या. यातील काही मुलींवर तर बालवयातच मातृत्व लादले गेले. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे.

.....

महिलांच्या तक्रारी संवेदनशीलपणे व गांभीर्याने घेतल्या जातात. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जलद तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले जाते. मात्र, बहुतांश प्रकरणांत आरोपी ओळखीचे असतात तर काही वेळा प्रेमप्रकरणांतूनही तक्रारी दाखल होत असल्याचे आढळून येते.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

....

गतवर्षीच्या दोन गुन्ह्यांची उकल नाही

चालू वर्षीच्या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. मात्र, गतवर्षीच्या दोन गुन्ह्यांची उकल करता आलेली नाही. पेठ बीड व नेकनूर ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यांचा यात समावेश आहे. पेठ बीडच्या प्रकरणात आरोपीचे नाव निष्पन्न झाले, पण त्याचा शोध लागला नाही.

....

Web Title: 'She' is insecure! 98 women lust victims in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.