‘वीजरोधक यंत्रणा बसवणार’
By Admin | Updated: March 17, 2017 23:58 IST2017-03-17T23:56:42+5:302017-03-17T23:58:36+5:30
परळी : वारंवार एकाच जागेवर होणाऱ्या वीज कोसळण्याच्या घटनांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांमध्ये वीजरोधक यंत्रणा बसविण्यात येणार

‘वीजरोधक यंत्रणा बसवणार’
परळी : वारंवार एकाच जागेवर होणाऱ्या वीज कोसळण्याच्या घटनांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांमध्ये वीजरोधक यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
अवकाळी पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.
बैठकीस आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. चे सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिकारी रमेश भताने, सर्व तालुक्याचे उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. कार्यकारी अभियंता एन. टी. पाटील, नाईकवाडे, कृषी, जलसंधारण, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीच्या कौठळी शिवारात, तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार एकाच जागेवर वीज कोसळून जीवितहानी होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यावर उपाय म्हणून वीजरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौठळीसह तालुक्यात दहा ते बारा ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
पिकांचे पंचनामे पूर्ण करून फळबागांच्या नुकसानीचे प्रस्ताव स्वतंत्रपणे पाठविण्यास सांगितले आहे. वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना चार लाख व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख असे एकूण सहा लाख रु पये मदत देण्यात आली असून जखमींनाही मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसानीचा अहवाल लवकर पूर्ण करून त्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिल्याचे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)