२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार २१९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:11+5:302021-02-05T08:28:11+5:30
बीड : जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील २ हजार १९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २६ लाख १० हजार ...

२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार २१९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर
बीड : जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील २ हजार १९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २६ लाख १० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा भार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही या कमी संख्येमुळे पडत आहे. कमी कुमक असतानादेखील संवेदनशील जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.
बीड जिल्ह्यातील सरासरी लोकसंख्या २६ लाख १० हजार इतकी आहे. त्या तुलनेत पोलीस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्येचे प्रमाण मात्र अत्याल्प आहे. जवळपास १० वर्षापूर्वी च्या जनगणनेनुसार २३१० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, त्या वर्षापासून आतापर्यंत २,१९७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरलेली आहे. त्यापैकी देखील काही जण आरोग्य रजेवर, प्रसूती रजेवर किंवा निलंबित असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा तण अधिकच वाढला आहे. राज्यात तब्बल १२ हजार ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीनंतर बीड जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा पोलीस प्रशासनाला आहे.
असे आहे पोलीस दलातील संख्याबळ
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक एक, अपर पोलीस अधीक्षक २, उपाधीक्षक मंजूक ८ कर्यरत ६, पोनि मंजूर २५ कार्यरत २४, सपोनि मंजूर ६१ कार्यरत ५९, पोउपनि मंजूर ९४ कार्यरत ७५, पोलीस कर्मचारी मंजूर २३१० कार्यरत २१९७ असे जिल्ह्यीतल पोलीस दलातील संख्याबळ आहे.
२६,१०,००० जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या
२ हजार १९७ पोलीस कर्मचारी
गुन्हेगारीमध्ये मागील वर्षी वाढ
घरफोडी, दुखापत करणे, दरोडा, अत्याचार या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. गतवर्षी अत्याचाराचे १२९ गुन्हे घडले आहेत. तर, घरफोडीचे २१७ गुन्हे नोंद झाले आहेत. तर, दुखापतीचे १,१०८ गुन्हे दाखल झाले आहेत. दरोडे १४ ठिकाणी झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. कर्मचाऱ्यांची संख्या व अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे देखील गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरीदेखील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे कर्तव्य बजावत आहे.
संवेदनशील गावांवर पोलिसांची करडी नजर
बीड जिल्ह्यातील काही गावांवर पोलिसांची करडी नजर असते, तसेच उत्सव काळात अतिरक्त फौजफाटा तैनात करावा लागते. शिवाय नाकाबंदी रात्रीची गस्तदेखील घालावी लागते, यातूनच नागरिकांच्या सुरक्षेला प्राध्यान्य दिले जाते. राज्याच्या राजकारणात बीड हा कायम केंद्रस्थानी असलेला जिल्हा आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांचे कार्यक्रमांची संख्यादेखील जास्त असते त्या ठिकाणीदेखील पोलीस सुरक्षा देणे गरजेचे असल्यामुळे अतिरिक्त ताण पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहेत.
मनुष्यबळ ही कमी आहे हे मान्य आहे, तरीदेखील आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्याची असलेली संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण यामुळे जास्तीचा ताण पोलीस कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्यासंदर्भात सविस्तर अहवालाद्वारे शासनाकडे वाढीव मनुष्यबळाची मागणी करण्यात येईल.
आर. राजा पोलीस अधीक्षक, बीड