Seasonal hostel only if there are 2 students | २० विद्यार्थी असतील तरच हंगामी वसतिगृह
२० विद्यार्थी असतील तरच हंगामी वसतिगृह

ठळक मुद्दे५५० हंगामी वसतिगृहांना मंजुरी : ३६ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखणार

बीड : साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, नव्या नियमानुसार वसतिगृहासाठी किमान २० विद्यार्थी आवश्यक आहे.
यंदा कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने दिवाळी साजरी करुन मजूर कारखान्यावर तोडणीसाठी गेले आहेत. दिवाळी सुटी संपल्यानंतर द्वितीय शैक्षणिक सत्र सुरु झाले. बहुतांश ऊस तोडणी मजुरांसोबत त्यांचे पाल्यही गेले आहेत. तर अनेक पाल्य गावातच आजी, आजोबा, नातेवाईकांकडे राहात आहेत. स्थलांतर करणाºया ऊस तोडणी मजुरांचे पाल्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी शासनाच्या वतीने हंगामी वसतिगृहाची योजना आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत चालू वर्षात हंगामी वसतिगृह सुरु करण्यासाठी तालुका पातळीवरुन माहिती व प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातून ४५ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर होईल असा कयास होता.
दरम्यान, नोव्हेंबरपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ हजार ५९५ मुला- मुलींचे स्थलांतर होऊ शकते, असे अनुमान निघाले. त्यानुसार पडताळणीनंतर ३ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ५५० वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली. या वसतिगृहांमध्ये ३६ हजार ५९५ मुला- मुलींची सोय होणार आहे. मात्र वसतिगृह सुरु करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्याचे पालन करणे चालकांना बंधनकारक आहे.
बीड तालुक्यातून ५०९४ मुले- मुली, अंबाजोगाई १६९९, आष्टी १४२१, धारुर ८००२, गेवराई ४५९८, केज २६१६, माजलगाव ३०८९, परळी १८०८, पाटोदा १४७५, शिरुर ३८८८ तर वडवणी तालुक्यातून १४२३ विद्यार्थ्यांची या हंगामी वसतिगृहात सोय होणार आहे.
बायोमेट्रिक हजेरी आवश्यक
ज्या हंगामी वसतिगृहांना मंजुरी दिली आहे, तेथील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी नसावी. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच वसतिगृहातील लाभार्थ्याच्या पालकांनी जिल्ह्याबाहेर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी स्थलांतर केलेले असावे. मंजुरीनंतर सुरु झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सर्व पातळीवर खात्री केल्यानंतरच किती स्थलांतर रोखले हे स्पष्ट होणार आहे.
जवळच्या वसतिगृहाचा पर्याय
ज्या गावातील स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, तेथील पाल्यांना जवळच्या वसतिगृहांशी संलग्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र, या विद्यार्थ्यांना नियमित मिळणाºया सुविधांकडे यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. तर २० पटसंख्येची अट रद्द करुन कमी पटसंख्येच्या ठिकाणीही वसतिगृह सुरु करावेत अशी मागणी पुढे आली आहे.
तालुकानिहाय हंगामी वसतिगृहे
बीड - ८५, अंबाजोगाई २०, आष्टी २०, धारुर ९६, गेवराई ७७, केज ४१, माजलगाव ४५, परळी ३१, पाटोदा ३०, शिरुर ७२, वडवणी ३३

Web Title: Seasonal hostel only if there are 2 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.