डोंगरदऱ्यात ओरडणारा बिबट्या आढळला मृत अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:14+5:302021-06-18T04:24:14+5:30
कडा (जि. बीड) : ऑक्टोबर महिन्यात आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालत दहशत निर्माण करून अनेकांवर हल्ले झाले. काहींचा या ...

डोंगरदऱ्यात ओरडणारा बिबट्या आढळला मृत अवस्थेत
कडा (जि. बीड) : ऑक्टोबर महिन्यात आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालत दहशत निर्माण करून अनेकांवर हल्ले झाले. काहींचा या हल्ल्यांत मृत्यू झाला; पण बिबट्या जेरबंद झाला नाही. अखेर त्याला करमाळा तालुक्यात गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि बिबट्याची दहशत कमी झाली. मातावळी डोंगरदऱ्यात गुरगुरणाऱ्या या बिबट्याची मेल्यानंतर कुजून माती झाली, तरी वन विभागाला कसलीच खबर देखील नसल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात उघड झाला आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी, मातावळी या परिसरात ओरडत बिबट्या फिरत होता. नरभक्षक नसल्याने वन विभागाकडून काहीही करण्यात आले नाही. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन शेतातील कामे करत असताना दिवसा व रात्रीही हा बिबट्या आवाज करायचा. आता हाच बिबट्या मातावळी डोंगरात कोसिम डोंगराच्या खालच्या बाजूला कधी मृत होऊन पडला, याची माहिती नसली तरी त्याची कुजून माती होऊन आता फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. वन विभागाचे कर्मचारी डोंगरात फिरतात. मग त्यांना हे दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बिबट्याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप समजले नाही. जेव्हा वन विभाग त्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल तेव्हाच कारण समोर येईल.
याबाबत आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांना विचारणा केली असता ते त्यांनी लोकमतला सांगितले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन तो बिबट्या आहे की, तरस ही खात्री करणार आहोत.